Agnipath Scheme Protest, PM Modi CM Yogi | लष्करासंबंधी असलेल्या अग्निपथ योजनेची घोषणा झाल्यापासूनच या योजनेविरोधात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत. पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर विरोधकांकडून विविध आरोप केले जात आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये आंदोलनाल हिंसक वळण लागल्याचेही चित्र आहे. अनेक ठिकाणी आंदोलकांनी सरकारी मालमत्तेचे मोठे नुकसान केले असल्याचीही माहिती आहे. अशातच पंतप्रधान मोदी यांच्या मदतीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ धावून आले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी अग्निपथ विरोधातील वैचारिक आग शमवण्यासाठी एक मोठी घोषणा केली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी तरूणांना एक विशेष आश्वासन दिले. याच संदर्भात योगी आदित्यनाथ यांनी एक ट्वीटदेखील केले आहे. योगीं व्यतिरिक्त देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनीही आंदोलक तरूणांना आणि विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. अग्निपथ योजनेच्या घोषणेनंतर देशातील अनेक राज्यांमध्ये याला विरोध केला जात आहे. या हिंसक आंदोलनांच्या दरम्यान योगी आदित्यनाथ यांनी मोठी घोषणा केली. अग्निपथ योजनेअंतर्गत यशस्वी झालेल्यांना अग्निवीरांना सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्यक्रम असेल अशी घोषणा त्यांनी केली. आदित्यनाथ म्हणाले की, केंद्र सरकारने अग्निपथ योजनेसाठी विशिष्ट वयाची अट ठेवली आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत लष्करात चार वर्षे देशाची सेवा केल्यानंतर अग्नीवीरांना उत्तर प्रदेशामध्ये नोकऱ्यांच्या वेळी प्राधान्य दिले जाणार आहे.
योगी आदित्यनाथ यांनी ट्वीट करून अशी माहितीदेखील दिली की, अग्निपथ योजनेत सामील होऊन सशस्त्र सेवा दलात कार्य करणाऱ्या तरूणांना नंतर राज्यातील पोलीस आणि इतर विभागातील नोकऱ्यांमध्येही प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे त्यांनी असे आवाहन केले की कोणत्याही विद्यार्थ्यांनी अग्निपथ विरोधात पसरवण्यात आलेल्या अफवांना किंवा दाव्यांना बळी पडू नका. शांतता राखा.
अग्निपथ योजनेमुळे नाराज झालेल्या तरूणांना समजवताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "तरूणांनो, भारताची अग्निपथ योजना तुमच्या आयुष्याला नवा आयाम देईल तसेच भविष्याला सुवर्ण आधार देईल. तुम्ही कोणत्याही चुकीच्या माहितीला बळी पडू नका. भारतमातेची सेवा करण्याचा निश्चय करणारे आमचे 'अग्निवीर' हा राष्ट्राचा अमूल्य निधी असेल आणि उत्तर प्रदेश सरकार अग्निवीरांना पोलीस आणि इतर सेवांमध्ये प्राधान्य देईल."
तत्पूर्वी गुरुवारी देखील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या योजनेचे कौतुक केले होते आणि अग्निपथ योजना तरुणांना देश आणि समाजाच्या सेवेसाठी तयार करेल असे सांगितले होते. त्यांना अभिमान वाटेल अशा भविष्याची संधी देईल. उत्तर प्रदेश पोलीस आणि त्यासंबंधी दलांमध्ये अग्निवीरांना सेवेत प्राधान्य दिले जाईल, असेही आश्वासन देण्यात आले होते.