नवी दिल्ली - केंद्र सरकारने सैन्यात तरुणांची भरती करण्यासाठी जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला बिहार, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये तरुणांकडून जोरदार विरोध सुरू झाला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अग्निपथ योजनेची घोषणा केल्यानंतर ठिकठिकाणी निदर्शने सुरू झाली आहेत. आता सलग तिसऱ्या दिवशी हे आंदोलन हिंसक झालं असून परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं पाहायला मिळत आहे. बिहारमध्ये या योजनेला तीव्र विरोध होत आहे. शुक्रवारी देखील राज्यातील अनेक भागात या योजनेच्या विरोधात तरूण रस्त्यावर उतरले. लखीसराय आणि समस्तीपूरमध्ये संतप्त आंदोलकांनी रेल्वेला आग लावली. त्याचबरोबर रेल्वे स्टेशनचीही तोडफोड केली.
हिंसक झालेल्या आंदोनलामुळे रेल्वे सेवेवरही मोठा परिणाम झाला असून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. ठिकठिकाणी होत असलेल्या विरोधामुळे रेल्वेसह रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लखीसराय स्टेशनवर मोठ्या प्रमाणात तरूण जमा झाले होते. त्यांनी या स्टेशनची तोडफोड केली. दिल्ली-भागलपूर दरम्यानच्या विक्रमशीला सुपरफास्ट ट्रेनला आंदोलकांनी आग लावली. या आगीत अनेक डब्बे जळाले. त्याचबरोबर रेल्वे स्टेशनवरील सामानाची तोडफोड केली.
काही ठिकाणी आंदोलकांनी रुळांवर धरणे धरत रेल्वे रोखून धरली, तर काही ठिकाणी टायर जाळून रस्त्यांवर फेकण्यात आले. मध्य प्रदेशमध्येही अग्निपथ योजनेला कडाडून विरोध होत आहे. तरुणांनी महामार्ग रोखला होता. इंदूरमध्ये जवळपास 150 हून अधिक तरुण या योजनेचा विरोध करत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये निदर्शने करण्यात आली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी जेहानाबाद, बक्सर आणि नवादा येथे रेल्वे थांबवण्यात आली. छपरा आणि मुंगेरमध्ये रस्ता जाळपोळीनंतर उग्र निदर्शने सुरू आहेत. सरकारने निर्णय मागे घ्यावा, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. यासंदर्भात बिहारमधील 17 जिल्ह्यांमध्ये निदर्शने करण्यात येत आहे.
अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत असताना केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने आता या योजनेत सैन्य भरतीसाठी कमाल वयोमर्यादा 23 वर्ष इतकी ठेवली आहे. याआधी ही वयोमर्यादा 21 वर्ष इतकी होती. गेल्या दोन वर्षांत एकही भरती झाली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. वयोमर्यादेत असलेली ही सवलत यंदाच्या पहिल्या भरतीसाठीच लागू असणार आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दल या तीनही दलांत मोठ्या संख्येने तरुणांची भरती करण्यासाठी केंद्र सरकारने 14 जून रोजी अग्निपथ भरती योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत तरुणांना संरक्षण दलात 4 वर्षे सेवा करावी लागणार आहे. पगार आणि पेन्शनचे बजेट कमी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.