- निनाद देशमुख
बेंगळुरू : येलहंका येथील हवाई दलाच्या विमानतळावर सुरू असलेल्या एअरो इंडिया प्रदर्शनात अपघातांची मालिका सुरूच आहे. शनिवारी एअर शो साठी आलेल्या नागरिकांच्या वाहनांसाठी उभारण्यात आलेल्या वाहनतळातील गवताने अचानक पेट घेतल्याने लागलेल्या आगीत जवळपास १५० मोटारी भस्मसात झाल्या. यामुळे आकाशात धुराचे लोट पसरले होते. हवाई दल, अग्निशामक दल आणि एनडीआरएफच्या जवानांनीही तातडीने घटनास्थळी जात आगीवर नियंत्रण मिळवले.
हे प्रदर्शन पाहण्यासाठी सर्वसामान्यांनाही दोन दिवस परवानगी देण्यात आली आहे. येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था विमानतळाजवळील महामार्गाच्या शेजारी करण्यात आली होती. सकाळी १०पासून एअर शो सुरू झाला होता. लढाऊ विमानाचे हवेत प्रात्यक्षिके सुरु असताना अचानक आकाशात धुराचे लोट दिसायला लागले. सुरुवातीला विमान कोसळले असा सर्वांचा समज झाला. मात्र वाहनतळावर ही आग लागल्याचे स्पष्ट झाले. एका हेलिकॉप्टरमधून आग विझविण्यासाठी एक पथक तातडीने पाठवण्यात आले. तो पर्यंत आगीने उग्र रूप धारण केले होते.गवतात ठिणगीपार्किंग स्थळावरील सुक्या गवतात ठिणगी पडून ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. कुणीतरी जळती सिगारेट गवतात टाकल्यामुळं ही आग लागली असावी. आग विझल्यानंतर दुपारी नियोजित वेळेत पुन्हा एअर शो सुरु करण्यात आला. या घटनेच्या चौकशीसाठी कोर्ट आफ इन्क्वायरी समितीची स्थापन करण्यात आली असून समितीच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे हवाई दलाने म्हटले आहे.