लोकसभा निवडणुकीत केंद्रातील सत्ताधारी भाजपाचं बहुमत हुकल्याने आणि विरोधी पक्षातील काँग्रेससह इंडिया आघाडीच्या संख्याबळात लक्षणीय वाढ झाल्याने विरोधी पक्षांमधील नेते सध्या कमालीचे आक्रमक झालेले दिसत आहेत. त्यातही विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारल्यानंतर राहुल गांधी यांनी नव्या लोकसभेच्या पहिल्याच अधिवेशनात केलेल्या भाषणामधून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यावेळी केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेवरून राहुल गांधी यांनी अनेक आरोप केले होते. मात्र हे आरोप संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फेटाळून लावले होते. त्यानंतर राहुल गांधी यांनी बुधवारी रात्री एक व्हिडीओ शेअर करत शहीद अग्निवीराच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला पुन्हा एकदा घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच या अग्निवीराच्या कुटुंबीयांना मदत मिळाली नसल्याचा आरोप केला. मात्र लष्कर आणि संबंधित अग्निवीराच्या वडिलांनी हा दावा फेटाळून लावला आहे.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये अग्निवीर जवानांचा मुद्दा उपस्थित करताना लुधियाना येथील अजय कुमार याचा उल्लेख केला होता. अजय कुमार याचा जानेवारी महिन्यात जम्मू काश्मीरमधील राजौरी येथे भूसुरुंगाच्या स्फोटात मृत्यू झाला होता. दरम्यान, लोकसभेत केलेल्या आपल्या दाव्याला खरं ठरवण्यासाठी बुधवारी रात्री या शहीद जवानाचा उल्लेख करत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्याबाबत आता लष्कराकडून स्पष्टिकरण देण्यात आलं आहे. तसेच एका वृत्तवाहिनीशी बोलताना शहीद अजय कुमारच्या वडिलांनीही याबाबत माहिती दिली आहे. शहीद अग्निवीर अजय कुमार याचे वडील चरणजीत सिंह यांनी सांगितले की, त्यांच्या खात्यात ९८ लाख रुपये जमा झाले आहेत. अजय कुमार याच्या मृत्यूनंतर ५० लाख रुपये मिळाले होते. तर १० जून रोजी ४८ लाख रुपये मिळाले, अशी माहिती त्यांनी झी न्यूज या हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
दरम्यान, राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यानंतर लष्कराकडूनही अजय कुमार याच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या मदतीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. लष्कराने आपल्या ट्विटमध्ये सांगितलं की, एकूण रकमेपैकी ९८.३९ लाख रुपये अग्निवीर अजय याच्या कुटुंबीयांना देण्यात आले आहेत. अग्निवीर योजनेतील तरतुदींनुसार ६७ लाख रुपयांची मदत आणि इतर लाभ हे पोलीस व्हेरिफिकेशननंतर दिले जातील. त्यामुळे मदतीची एकूण रक्कम ही एक लाख ६५ कोटी एवढी होईल.
दरम्यान, राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांनी केलेले अग्निपथ भरती योजनेसंदर्भातील दावे फेटाळून लावताना अग्निवीर योजना ही १५८ संघटनांकडून सल्ले घेतल्यानंतर सुरू करण्यात आल्याचे सांगितले. लोकसभेमध्ये राहुल गांधी यांनी अजय कुमार याच्या वडिलांच्या घेतलेल्या भेटीचा उल्लेख करत केंद्र सरकार त्याला शहिदाचा दर्जा दिला नाही. तसेच त्याच्या कुटुंबाला योग्य मोबदलाही दिला नाही, तसेच त्याच्या कुटुंबासाठी पेन्शनचीही कुठली व्यवस्था केलेली नाही, असा दावा केला होता. त्याला उत्तर देताना राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी हे चुकीची विधानं करत सभागृहाची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला होता.