नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर सर्वांच्या नजरा संसदेच्या अधिवेशनावर लागल्या आहेत. या अधिवेशनापूर्वी विरोधकांना आयत कोलीत मिळालं आहे. अग्निवीर योजना, आरक्षण, संविधान आणि पेपर लीकमुळे एनडीए सरकार बॅकफूटवर आधीच आले आहे. विरोधकदेखील सातत्याने हे मुद्दे मांडले जात आहेत. विरोधक अधिवेशनात या मुद्द्यावरुन सरकारला घेरण्याची तयारी करत आहेत. एकूणच काय, तर संसदेचे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.
अधिवेशन कधी सुरू होणार?संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिलेल्या माहितीनुसार, 18व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 9 दिवसांचे असेल. येत्या 24 जूनपासून अधिवेशनाला सुरुवात होईल आणि 3 जुलै रोजी संपेल. या अधिवेशनात अध्यक्षांची निवड, राष्ट्रपतींचे अभिभाषण आणि सरकारी कामकाज प्रस्तावित आहे. संसदेचे कामकाज सुरळीत चालावे, यासाठी रिजिजू यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचीही भेट घेतली होती.
NEET परीक्षेचा वाद काय आहे?भारतातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी आवश्यक असलेली NEET परीक्षा, नॅशनल टेस्ट एजन्सीद्वारे घेतली जाते. या परीक्षेत पेपरफुटी आणि काही विद्यार्थ्यांना दिलेल्या ग्रेस मार्कावरुन वाद सुरू झाला. यानंतर विरोधकांनीही हा मुद्दा उचलून धरला आहे.
NET परीक्षेचा वाद काय आहे?राष्ट्रीय पात्रता परीक्षा, म्हणजेच नेट परीक्षा विद्यापीठ आयोगाद्वारे घेतली जाते. या परीक्षेद्वारे पीएचडीला प्रवेश मिळतो. यावेळी भारतात 9 लाख उमेदवारांनी अर्ज भरले होते. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, एजन्सीला पेपर लीकशी संबंधित काही इनपुट मिळाले होते, त्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, विभागानेच हा निर्णय घेतला आहे.