बेळगाव : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अग्निवीर योजने अंतर्गत तयार करण्यात आलेली अग्निवीरांची तुकडी प्रत्यक्ष सैन्यात जाण्यास सज्ज झाली असून, शनिवारी थ्री- एमटीआर रेजिमेन्ट, सांबरा येथे झालेल्या एअरमन ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांचा दीक्षांत सोहळा दिमाखात पार पडला. दीक्षांत सोहळ्यात ब्रिगेडियर अरविंदर सिंग सहानी यांनी या जवानांना दीक्षा दिली.वायुदल प्रशिक्षण केंद्र, बेळगाव येथे अग्निवीर वायू प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत सोहळा थाटामाटात पार पडला. या सोहळ्यात चौथ्या तुकडीतील १८०० हून अधिक प्रशिक्षणार्थींनी २२ आठवड्यांचे प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण केले. यावेळी भारतीय वायुदलाच्या कॉलेज ऑफ एअर वॉरचे कमांडंट एअर वाइस मार्शल प्रशांत शरद वडोदकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.प्रशिक्षणार्थींच्या शिस्तबद्ध व कठोर परिश्रमाचे कौतुक करताना परीक्षण अधिकाऱ्यांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रशिक्षणार्थींना विशेष पुरस्कार देण्यात आले. यामध्ये नितीन कुमार यांना ''सर्वोत्तम शैक्षणिक कामगिरी'' पुरस्कार, दीपाली यांना ''सर्वोत्तम जीएसटी'' पुरस्कार, नितीन कुमार यांना ''सर्वांगीण सर्वोत्तम'' पुरस्कार, तर सुहानी साहू यांना ''सर्वोत्तम शार्प शूटर'' पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी वायुदल प्रशिक्षण शाळेचे एअर ऑफिसर कमांडिंग आणि त्यांच्या चमूने या सोहळ्याचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करण्यात आले.
अग्निवीर प्रत्यक्ष सैन्यात जाण्यास सज्ज, बेळगावात १८०० हून अधिक प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत सोहळा दिमाखात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 5:12 PM