Agniveer Reservation in Assam Rifles : केंद्र सरकारने आणलेल्या अग्निवीर योजनेवरुन देशात मोठा गदारोळ सुरू आहे. विरोधक सातत्याने या योजनेवर टीका करत आहेत. अशातच, सरकारने माजी अग्निवीरांसाठी केंद्रीय सुरक्षा दलांमध्ये आरक्षणाची घोषणा केली आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज (24 जुलै) राज्यसभेत एका लेखी उत्तरात सांगितले की, 'केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF) आणि आसाम रायफल्समध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)/रायफलमन पदाच्या भरतीमध्ये माजी अग्निवीरांसाठी 10% जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, अग्निवीर जवानांना वयोमर्यादा आणि शारीरिक चाचणीतूनही सूट देण्यात येत आहे.
अग्निवीर योजनेअंतर्गत भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात सैनिकांची भरती केली जाते. सशस्त्र दलातील नियुक्तीची ही एक नवीन श्रेणी आहे. याअंतर्गत 75 टक्के अग्निवीर चार वर्षांच्या सेवेनंतर कोणत्याही पेन्शन लाभाशिवाय निवृत्त होतात, तर उर्वरित 25 टक्के अग्निवीर नियमित सैनिक म्हणून दलात सामील होतात. या योजनेवरुन विरोधक सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. त्यामुळेच आता सरकारने उर्वरित 75 टक्के अग्निवीरांच्या रोजगाराची व्यवस्था केली आहे.
CAPF आणि आसाम रायफल्समध्ये किती पदे रिक्त आहेत?गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी CAPF आणि आसाम रायफल्समधील रिक्त पदांचीही माहिती दिली. ते म्हणाले, "सीएपीएफ आणि आसाम रायफल्समध्ये 1 जुलै 2024 पर्यंत रिक्त पदांची संख्या 84,106 आहे. एप्रिल 2023 ते फेब्रुवारी 2024, या कालावधीत 67,345 उमेदवारांची भरती करण्यात आली आहे. याशिवाय 64,091 रिक्त पदे अधिसूचित करण्यात आली आहेत. ही पदे भरतीच्या विविध टप्प्यात आहेत."