Agra Crime : कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. या घटनेच्या विरोधात डॉक्टर आणि सामान्य जनता रस्त्यावर उतरली आहे. देशभरातून या घटनेचा विरोध होत आहे. असं असतानाही महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील आग्रा शहरात घडला आहे. स्कूटीवरुन जाणाऱ्या एका तरुणीची काही तरुणांनी छेड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने हा सगळा प्रकार त्याच्या कॅमेरात शूट केला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. धक्कादायक बाब आरोपींनी तरुणीचा तब्बल तीन किमीपर्यंत पाठलाग केला होता.
उत्तर प्रदेशातील आग्रा येथील या घटनेवरुन संताप व्यक्त केला जात आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दोन बाईकवर बसून पाच तरुण स्कूटरवरून प्रवास करणाऱ्या मुलीचा विनयभंग करताना दिसत आहेत. आरोपींनी सुमारे तीन किलोमीटरपर्यंत मुलीचा पाठलाग केला. तिच्यावर अश्लील कमेंट केली आणि तिला स्कूटरवरून पाडून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर बाईकवर आलेल्या आरोपींनी मुलीला धमकावले सुद्धा होते. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी पाच पैकी तिघांना अटक केली. तर इतर फरार आरोपींचा सध्या शोध सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाईकवरील आरोपी आग्र्याच्या पुराणी मंडईपासून तरुणीच्या मागावर होते. त्यांच्यापासून वाचण्यासाठी तरुणी व्हिक्टोरिया पार्कमार्गे यमुना किनारा रोडच्या दिशेने स्कूटी चालवत आली होती. हाथी घर येथे तरुणाची विनयभंग करत असल्याचे पाहून तेथून जाणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचारी राजीव कुमार यांनी त्याला पाहिले आणि मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला. राजीव यांनी आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यातील दोघांनी धमकावण्यास सुरुवात केली. राजीव कुमार यांनी ताबडतोब तिथे तैनात असलेल्या पोलिसांशी संपर्क साधून संपूर्ण घटना सांगितली.
माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी फौजफाट्यासह आरोपींच्या मागावर जाऊन त्यांना घेराव घातला आणि त्यांना अटक केली. आग्रा पोलिसांनी गुड्डी मन्सूर खान येथील युसूफ आणि हिंग मंडी येथील फिरोज यांना अटक केली आहे. सिंघी गली येथील फैजान आणि दुसऱ्या दुचाकीवर बसलेल्या दोघांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, याप्रकरणी अँटी रोमिओ पथकाने गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी युसूफ आणि फिरोजला या आरोपींना अटक करण्यात आली असून कलम २९६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतरांचा शोध सुरू आहे.