आग्रा :जम्मू-काश्मीर येथील राजौरी जिल्ह्यात काल भारतीय सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सैन्य दलातील दोन अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले होते. शहीद जवानांमध्ये आग्रा येथील शुभम गुप्ता या जवानाचाही समावेश होता. यंदा मुलाच्या लग्नासाठी तयारी सुरू असताना त्याच्या मृत्यूची बातमी येऊन धडकल्याने गुप्ता कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
लहानपणापासूनच भारतीय सैन्य दलाचं आकर्षण असणारा शुभम हा काही वर्षांपूर्वी सैन्यात दाखल झाला होता. देशासाठी लढणाऱ्या मुलाचा शुभमच्या आई-वडिलांनाही सार्थ अभिमान वाटत असे. यंदा शुभमचं लग्न करावं, या विचारात त्याचे पालक होते. मात्र बुधवारी धर्मसाल येथील बाजीमल भागात दोन दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती सैन्य दलाला मिळाली. त्यानंतर त्यांचा खात्मा करण्यासाठी सैन्यदलाने सर्च ऑपरेशन सुरू केलं. यामध्ये शुभमचाही समावेश होता.
भारतीय लष्कराच्या कारवाईचा अंदाज आल्यानंतर दहशतवाद्यांनीही अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यामध्ये लष्करातील दोन अधिकारी आणि दोन जवानांना आपले प्राण गमवावे लागले. शुभम गुप्ता शहीद झाल्याची बातमी मिळताच आग्रा येथे राहणाऱ्या त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच शुभमच्या आईची काही काळासाठी शुद्ध हरपली होती.
पीर पंजालचे जंगल आणि लष्करासमोरचे आव्हान
जम्मू-काश्मीरमधील पीर पंजाल येथील जंगल गेल्या काही वर्षांत सतत होणाऱ्या चकमकींमुळे सुरक्षा दलासाठी आव्हान ठरले आहे. भौगोलिक स्थिती आणि घनदाट जंगलांचा फायदा घेत दहशतवादी भारतात घुसण्याचा प्रयत्न करतात. गेल्या आठवड्यात राजौरी जिल्ह्यात झालेल्या चकमकीत जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता.