उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका माध्यमिक शाळेत एक मुख्याध्यापिका आणि शिक्षिकेमध्ये क्षुल्लक कारणावरून जोरदार भांडण झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र हे प्रकरण पुढे इतकं वाढलं की हाणामारीपर्यंत पोहोचलं. शाळेतील मुख्याध्यापिका आणि शिक्षिका यांच्यात झालेल्या भांडणाचा, वादावादीचा आणि मारहाणीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुख्याध्यापिका आणि शिक्षिका यांच्यातील वादाचे चार व्हि़डीओ व्हायरल झाल्याचं म्हटलं जात आहे. पहिल्या 45 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये मुख्याध्यापिका शाळेत उशिरा येण्याबद्दल शिक्षिकेला फटकारत आहेत. यावरून दोघांमध्ये वाद झाला आहे. उपस्थित कर्मचारी दोघींचा गप्प बसण्यास सांगत असतात दोघींमधील वाद वाढत जातो. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये दोघींमध्ये जोरदार भांडण सुरू आहे.
दोघीही एकमेकींसाठी अपशब्द वापरत आहेत. शिक्षिका मुख्याध्यापिकेला म्हणते की, मी तुला नोकरी कशी करायची हे शिकवेन, ज्यामुळे मुख्याध्यापिका आणखी चिडते. तेथे उपस्थित असलेले लोक दोघींनाही वाद घालू नका, असा सल्ला देत आहेत, मात्र काही वेळातच मुख्याध्यापिका आणि शिक्षिका यांच्यातील वाद हाणामारीचं रूप घेतो.
मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण सिकंदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंगना गावात असलेल्या प्राथमिक शाळेशी संबंधित आहे. महिला शिक्षिका गुंजा चौधरी ही शुक्रवारी सकाळी उशिरा शाळेत पोहोचल्याने मुख्याध्यापिकेने तिला अडवले. अडवणुकीमुळे गुंजा संतापली. यावरून दोघांमध्ये हाणामारी झाली आहे. याप्रकरणी सिकंदरा पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.