आग्रा - स्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. अनेकदा युजर्सना रिचार्ज संपल्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. मात्र कोणी जर पोलीस तुम्हाला मोबाईल रिचार्ज करून देतील असं सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस नेहमीच सतर्क असतात. पोलिसांना मदत करणाऱ्या नागरिकांना हा मोबाईल रिचार्ज मिळणार आहे.
पोलिसांना तक्रारीचे अनेक फोन येत असतात. पोलीसही सर्व प्रकरणाचा तपास करत असतात. अनेकदा तक्रारीसाठी येणारे फोन हे खोटे असतात. पोलिसांची दिशाभूल केली जात असल्याने यावर आता पोलिसांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे. योग्य माहिती देणाऱ्या नागरिकांना आग्रा पोलीस मोबाईल रिचार्च करून देणार आहेत. आग्राचे पोलीस अधीक्षक बबलू कुमार यांनी ही नवी युक्ती आणली आहे. यामध्ये पोलिसांना योग्य माहिती देणाऱ्या व्यक्तींना मोबाईलचा रिचार्ज करून देण्यात येणार आहे.
जनतेशी थेट संवाद साधता यावा यासाठी आग्रा पोलिसांच्या वतीने एक नंबरही जारी करण्यात आला आहे. 9454458046 या क्रमांकावर फोन किंवा मेसेज करुन नागरिक पोलिसांना योग्य माहिती देऊ शकतात. तसेच व्हॉट्सअॅपवरही त्याच्याशी संवाद साधू शकतात. पोलिसांना योग्य माहिती देऊन मदत करणाऱ्या नागरिकांना मोबाईलचा रिचार्ज करून दिला जाईल. 4S असं याला नाव देण्यात आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
4S मध्ये नागरिकांना विविध समस्या, तक्रारी, सुचना आणि तोडगा देता येणार असल्याची माहिती बबलू कुमार यांनी दिली आहे. पोलिसांना माहिती देणाऱ्यांना मोबाईल रिचार्जसोबतच पोलिसांकडून एक प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. यामुळे पोलीस आणि जनतेत सुसंवाद राहील. तसेच पोलिसांतचे नेटवर्क हे अधिक मजबूत होईल. पोलिसांना नागरिकांच्या समस्या जाणून घेता येतील. तसेच पोलीस आणि तक्रारीबाबत अनेकांच्या मनात भीती असते. मात्र 4S मुळे नागरिकांच्या मनातील भीती कमी होऊन ते पोलिसांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतील अशी माहिती बबलू कुमार यांनी दिली आहे.