उत्तर प्रदेशातील आग्रा येथे समाजवादी पक्षाकडून महापौरपदाची निवडणूक लढवणाऱ्या जुही प्रकाश यांनी फेसबुकवर लाईव्ह करत आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे. त्या म्हणाल्या की, हे माझे शेवटचे लाईव्ह आहे. जर मला न्याय मिळाला नाही तर मी आत्महत्या करेन. दरम्यान, जुही यांनी आरोप केला आहे की, त्यांच्या पतीने तिला मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच, तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, पोलीस त्यांना अटक करत नाहीत.
माजी महापौर उमेदवाराचा फेसबुक लाईव्ह व्हिडिओ व्हायरल होत आहे. सहा मिनिटे 16 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये त्यांनी पोलिसांवर अनेक आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या की, "माझा सतत मानसिक छळ केला जातो. कोणत्याही व्यक्तीला आत्महत्या केल्यावर न्याय मिळतो का? न्याय कसा मिळणार? पोलीस काहीच करत नाहीत. कोणतीच कारवाई करत नाहीत. मी आत्महत्या केली तर काय कारवाई करणार?"
दरम्यान, जुही प्रकाश यांनी पतीविरोधात पोलिसात तक्रार केली होती, त्यानंतर पती योगेंद्र प्रताप सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, दोन महिने उलटले तरी योगेंद्र प्रताप सिंह यांना पोलीस अटक करत नसल्याचा आरोप जुही यांनी केला आहे. तसेच, आपण राहत असलेल्या इमारतीतील लोकांनी दिलेल्या पुराव्यांवरून व जबाबावर पुढील कारवाई झालेली नाही, असेही जुही यांनी म्हटले आहे.जुही यांचा हा लाइव्ह व्हिडिओ लोक खूप शेअर करत आहेत.