आग्रा : लोकांमधील संवेदनशीलता हरवत चालल्याची अनेक उदाहरणं सातत्याने समोर येत असतात. राजस्थानमध्ये अपघातग्रस्त बाइकस्वारांना मदत करायची सोडून काही माणसं त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यात दंग असल्याची घटना ताजी असतानाच आता उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय सैन्य दलात भरती होण्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणून एका तरुणाने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली. यातील अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे हा तरुण आत्महत्या करत असल्याचं तब्बल 2,500 हून अधिक लोकांनी पाहिलं. मात्र कोणीही त्याला आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी धावून आले नाहीत.
मुन्ना कुमार असं या तरुणाचं नाव असून तो आग्रा येथील शांती नगर परिसरात राहत होता. बुधवारी (11 जुलै) सकाळी तरुणाने फेसबुकवर 1.9 मिनिटांचा एक व्हिडीओ अपलोड केला. या व्हिडीओत तो आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलणार असल्याने सर्वांची माफी मागत होता. त्याचा हा व्हिडीओ तब्बल 2,750 लोक पाहत होते. मात्र कोणीही त्याच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना त्याबाबत माहिती दिली नाही. तरुणाने आत्महत्येआधी एक चिठ्ठीही लिहिली होती. त्यामध्ये त्याने आत्महत्येला तो स्वत: च जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
भारतील सैन्यात नोकरी करण्याचे मुन्नाने स्वप्न पाहिले होते. मात्र पाच वेळा प्रयत्न करून ही तो प्रवेश परीक्षा पास झाला नाही. त्यामुळे त्याचे आईवडीलही निराश झाले होते. मुन्नाचा भाऊ विकास कुमार याने मुन्नाने भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी भगत सिंगकडून प्रेरणा घेतल्याचं सांगितलं. तसेच आत्महत्येआधीही तो सगळ्यांशी नेहमीसारखाच वागत असल्याचं म्हटलं. तरुणाने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनाही धक्का बसला आहे.