नवी दिल्लीमध्य प्रदेशातील शेतकरी संमेलनात शेतकऱ्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नव्या कृषी कायद्यांवरुन विरोध करत असलेल्या विरोधीपक्षांवर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जुन्या आश्वासनांची आठवण विरोधकांना करुन दिली.
"जे काम खरंतर २५ वर्षांपूर्वी व्हायला हवं होतं. ते आम्हाला आज पूर्ण करावं लागत आहे. कृषी कायदे काही एका रात्रीत तयार झालेले नाहीत. यावर गेल्या दोन दशकांपासून केंद्र, राज्य सरकार आणि संघटना चर्चा करत आहेत. आम्ही फक्त गेल्या अनेक वर्षांपासून स्थगित असलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं काम करत आहोत", असं मोदी म्हणाले.
विरोधीपक्षावर जोरदार हल्ला"जे लोक जाहीरनाम्यात कृषी कायद्यांची वकिली करत होते. त्यांनी आजवर हे कायदे लागू केले नाहीत", असं मोदी म्हणाले. विरोधी पक्षाच्या याआधीचे जाहीरनामे आणि कृषी क्षेत्र सांभाळण्यांनी लिहिलेली पत्र वाचली तर लक्षात येईल आज कृषी कायद्यांमध्ये असलेल्या तरतूदी लागू करण्याची शिफारस केलेली पाहायला मिळेल. पण आज मोदी हे सगळं लागू करत असल्यानं विरोधकांना पोटदुखी होतेय, असा निशाणा पंतप्रधानांनी साधला.
"कृषी कायद्यांचं श्रेय मला देऊ नका. तुमच्या जाहीरनाम्याला याचं श्रेय देतो. मी शेतकऱ्यांचं भलं करु इच्छित आहे. त्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांना गोंधळात टाकण्याचं काम बंद करा. हे कायदे लागू होऊन ६ महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला आहे. पण आता अचानक विरोधक शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून गोळी मारत आहेत", असंही मोदी म्हणाले.