ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - व्हीव्हीआयपींसाठी अगुस्ता वेस्टलँड कंपनीकडून खरेदी केलेल्या हॅलिकॉप्टर मुद्यावरुन राज्यसभेत चर्चेला सुरुवात होताच अपेक्षेप्रमाणे गदारोळ झाला. खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे नाव उच्चारताच आक्रमक झालेले काँग्रेस खासदार राज्यसभा अध्यक्षांसमोरील वेलमध्ये आले आणि जोरदार त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना सोनिया गांधींनी या सरकारला दोन वर्षे झाली असून त्यांनी या दोन वर्षांमध्ये काहीच चौकशी का केली नाही असा प्रतिप्रश्न केला आहे. माझ्याकडे लपवण्यासारखं काहीच नसून आपण कुणालाही घाबरत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
तर, अहमद पटेल यांनी या आरोपांमध्ये किंचित जरी सत्य आढळलं तरी त्यांनी आम्हाला फाशी द्यावं अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अगुस्ता वेस्टलँडच्या खरेदीमध्ये भारतीय उच्चपदस्थांनी लाच खाल्याचे इटालीतल्या कोर्टात सिद्ध झाले आणि लाच देणाऱ्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षाही ठोठावण्यात आली. मंगळवारी मिलानमधल्या कोर्टाचा हा निकाल आल्यानंतर त्याचे पडसाद अपेक्षेप्रमाणे भारतामध्ये आज संसदेत उमटले.
सुब्रमण्यम स्वामी यांनी लाच दिली ते जेलमध्ये, ज्यांनी खाल्ली ते वेलमध्ये असं म्हणत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.
इटालीच्या कोर्टाच्या निकालामध्ये श्रीमती गांधी, अहमद पटेल, हवाई दलाचे तत्कालिन प्रमुख एम. सी. त्यागी आदींचे उल्लेख आहेत. या खरेदीप्रकरणामध्ये अनेक भारतीयांनी लाच खाल्ली असल्याचे स्पष्ट होत असले तरी नक्की कुणी लाच घेतली याबाबत संदिग्धता आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू असून लवकरच यामागील सत्य बाहेर येईल अशी अपेक्षा आहे.
भाजपा व केंद्र सरकार काही गोष्टी सांगत आहे, तर काँग्रेसचे नेते वेगळंच काही सांगत आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्यात यावी आणि सत्य जनतेसमोर ठेवावे. - बसपा नेत्या मायावती