ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण; "आरोपीनं घेतली काँग्रेसच्या बड्या नेत्यांची नावं, कमलनाथांच्या मुलाचाही समावेश"
By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 18, 2020 01:00 PM2020-11-18T13:00:30+5:302020-11-18T13:03:18+5:30
जामिनावर बाहेर असलेले राजीव सक्सेना हे चार्टर्ड अकाउंटंट असून, या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. त्यांना 2019मध्ये दुबई येथून प्रत्यार्पन प्रक्रियेने भारतात आणण्यात आले आहे.
नवी दिल्ली - ऑगस्टा वेस्टलँड व्यवहारातील आरोपी राजीव सक्सेना यांनी चौकशीदरम्यान काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांची नावे घेतली आहेत. यात मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रतुल पुरी शिवाय त्यांचा मुलगा बकुल नाथ यांचाही समावेश आहे. मात्र, आपल्या मुलाचा या प्रकरणाशी कसल्याही प्रकारचा संबंध नाही, असे स्पष्टिकरण कमलनाथ यांनी दिले आहे. इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, आरोपी राजीव सक्सेना यांनी सलमान खुर्शीद आणि अहमद पटेल या मोठ्या नेत्यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे.
जामिनावर बाहेर असलेले राजीव सक्सेना हे चार्टर्ड अकाउंटंट असून, या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. त्यांना 2019मध्ये दुबई येथून प्रत्यार्पन प्रक्रियेने भारतात आणण्यात आले आहे. ईडीने त्यांची 385 कोटी रुपयांची संपत्ती अॅटॅच केली होती. तसेच यानंतर त्यांची चौकशी केली होती.
चौकशीत 'एपी'चा उल्लेख -
इंडियन एक्सप्रेसकडे राजीव सक्सेना यांचे 1000 पाणांचे निवेदन आहे. जे त्यांनी ईडीसमोर दिले आहेत. सक्सेना यांनी ईडीला सांगितले, की आरोपी डिफेंस डीलर सुशेन मोहन गुप्ता यांची कंपनी इंटर्सटेलर टेक्नॉलजीजच्या माध्यमाने ऑगस्टा वेस्टलँडकडून अवैध पैसा आला आहे. गौतम खेतान हे सुशेन मोहन गुप्ता यांच्या मार्फत ही कंपनी चालवतात. इडीने सुषेण मोहन गुप्ता आणि गौतम खेतान या दोघांनाही अटक केली आहे. सध्या हे दोघेही जामिनावर आहेत.
सक्सेना यांनी म्हटले आहे, सुषेण मोहन गुप्ता आणि गौतम खेतान हे चर्चेदरम्यान घोटाळ्याचा लाभ घेणाऱ्या राजकारण्यांत 'एपी'चेही नाव घेत होते. सक्सेना यांच्या मते, 'एपी'चा वापर अहमद पटेल यांच्यासाठी करण्यात येत होते. याशिवाय, त्यांनी सत्तेतील आपला रुतबा दाखवण्यासाठी राजकारणातील मोठ्या नेत्यांची नावे घेतली. त्यांनी अनेक वेळा सलमान खुर्शीद आणि कमल चाचांचा उल्लेख केला. हा उल्लेख माझ्यामते कमलनाथ यांच्यासाठीच होता.
कमलनाथांनी आरोप फेटाळले -
यासंदर्भात बोलताना कमलनाथ म्हणाले, रतुल पुरी यांच्या कंपन्या आणि व्यवहारांशी त्यांचा काहीही संबंध नाही. माझा मुलगा बकुलनाथ हा दुबईचा एनआरआय आहे. ते म्हणाले, या कंपनीसंदर्भात मला काहीही माहीत नाही. तसेच या कंपनीशी आपले संबंध असल्याचे सिद्ध होईल, असे दस्तऐवजही नाहीत. एक ऑफशोअर खाते उघडून कुणीही कुठल्याही बेनिफिशरी ओनरचे नाव टाकू शकते.
खुर्शीद यांनी आरोप फेटाळले -
ऑगस्टा वेस्टलँडच्या चौकशीत आपले नाव घेतले गेले याचे आश्चर्य वाटते, असे सलमान खुर्शीद यांनी म्हटले आहे. सुशेन मोहन यांचा मुलगा देव मोहन आमचे मित्र आहेत आणि मी त्यांचा शुभचिंतक आहे. मी जेवढे ओळखतो, त्यावरून त्यांचा रतुल पुरी अथवा राजीव सक्सेना यांच्याशी काही संबंध असेल, असे मला वाटत नाही, असेही खुर्शीद यांनी म्हटले आहे.