नवी दिल्ली : अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची पाळेमुळे पुण्यापर्यंत पसरली आहेत. याप्र्रकरणी तुरुंगात असलेला मध्यस्थ सुशेन मोहन गुप्ता याचे सासरे व पुण्याचे प्रसिद्ध उद्योजक दिनेश मुनोत यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मार्चमध्ये समन्स बजावला आहे. ‘ईडी’तील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर या वृत्तास दुजोरा दिला. तब्बल साडेतीन हजार कोटी रूपयांच्या अगुस्ता वेस्टलँड गैरव्यवहारात कोट्यवधींची लाच देण्याचा प्रयत्न झाला होता. लाचेची रक्कम गुप्ता यांनी सासरे मुनोत यांच्या कंपन्यांमार्फत गुंतवल्याचा प्राथमिक संशय ईडीला आहे. त्यामुळे मुनोत यांना समन्स दिला आहे. गुप्ता यांनी मुनोत यांच्या तृप्ती या मुलीशी विवाह केलेला आहे. म्हैसूरमधील मॉल देशभरातील पंचतारांकित हॉटेल्समध्ये गुप्ता व मुनोत यांची भागीदारी आहे. गुप्ता यांच्याकडे दोन डायºया, एक पेन ड्राईव्ह व काही सुटी कागदपत्रे आढळली. त्यांनी मुनोत यांच्याशी देवाणघेवाण केल्याची नोंद आहे.प्रतिक्रिया देण्यास नकारउद्योजक दिनेश मुनोत यांचे पुण्यात शिवाजीनगर परिसरात कार्यालय आहे. त्यांच्या कार्यालयाशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.मुनोत यांना समन्स का?गुप्ताच्या चौकशीत मुनोत यांचे नाव पुढे आले. मोसर बेअर पॉवर कंपनीने ३० टक्के व्यावसायिक भागीदारीसाठी गुप्ता यांच्याशी काही महिन्यांपूर्वी संपर्क केला. त्यासाठी गुप्ताने डीएमजी, डीएम मुणोत व मॅट्रिक्स ग्रुपमार्फत पैसे उभे केले. हा सर्व व्यवहार डीएम पॉवर प्रायव्हेट लिमिडेट या कंपनीमार्फत झाला.हीच कंपनी राजीव सक्सेना यांच्या मालकीची आहे. सक्सेना यांच्यावरही ईडीला संशय आहे. सक्सेना व मुनोत यांची घनिष्ठ व्यावसायिक भागिदारी आहे.मुनोत यांनी सक्सेनांच्या डीएम पॉवर मेट्रिक्स तर सक्सेना यांनी मुनोत यांच्या म्हैसूर हॉस्पिटॅलिटीमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे. ‘सक्सेना-गुप्ता-मुनोत’ त्रिकुटावर ‘ईडी’ला आर्थिक देवाणघेवाणीचा संशय आहे.
अगुस्ता वेस्टलँड : मुनोत यांना ‘ईडी’चे समन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 3:42 AM