ऑगस्टाच नव्हे, ख्रिश्चिअन मिशेलला इतर व्यवहारांमधूनही मिळाले पैसे- ईडी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 10:12 PM2019-01-05T22:12:22+5:302019-01-05T22:14:05+5:30
ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील आरोपी ख्रिश्चिअन मिशेलच्या कोठडीत वाढ
नवी दिल्ली: ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी चॉपर खरेदी प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेला मध्यस्त ख्रिश्चिअन मिशेलला इतरही सुरक्षा करारांमध्ये पैसे मिळाल्याचा दावा सक्तवसुली संचलनालयानं केला. दिल्ली कोर्टाला सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. दुसऱ्या संरक्षण करारांमध्येही मिशेल मध्यस्त होता. याची चौकशी अद्याप पूर्ण व्हायची आहे, असं ईडीच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं. यानंतर कोर्टानं मिशेलला 27 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
मिशेलला ऑगस्टा वेस्टलँड करारातून 2.42 कोटी युरो (जवळपास 192 कोटी रुपये) आणि 1.6 कोटी पाऊंड (जवळपास 142 कोटी रुपये) इतकी रक्कम मिळाली, अशी आकडेवारी ईडीनं विशेष न्यायमूर्ती अरविंद कुमार यांना दिली. 'ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात सध्या मिशेलची चौकशी सुरू आहे. त्यातून दुसऱ्या संरक्षण करारांमध्येही मिशेलला पैसे मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणांची चौकशी आता ईडीकडून केली जाणार आहे,' असं ईडीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं.
मिशेल रोकड मिळवण्यासाठी आणि मालमत्तेच्या खरेदीसाठी हवाला ऑपरेटर्सच्या माध्यमातून पैसे घ्यायचा, अशी माहिती ईडीचे वकील डी. पी. सिंह आणि एन. के. मत्ता यांनी न्यायालयाला दिली. आज मिशेलची 14 दिवसांची कोठडी संपत होती. त्यामुळेच ईडीनं त्याला न्यायालयात हजर केलं. मिशेलला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात यावी, अशी विनंती ईडीकडून करण्यात आली होती. मिशेलला जामीन मिळाल्यास तो देशाबाहेर पळून जाऊ शकतो, अशी भीती ईडीच्या वकिलांनी व्यक्त केली होती.