ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - अगुस्ता वेस्टलँडला मेक इन इंडिया, संरक्षण सामग्री प्रदर्शनात का सहभागी करुन घेतले ? असा प्रश्न काँग्रेसने केंद्र सरकारला विचारला आहे. त्याला उत्तर देण्यासाठी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर येत्या ४ मे म्हणजेच बुधवारी अगुस्ता वेस्टलँड कराराची कागदपत्रे संसदेसमोर ठेवणार आहेत.
अगुस्ता वेस्टलँड प्रकरणातील सत्य आणि सविस्तर घटनाक्रम मांडणारे दस्तावेज मी चार मे रोजी संसदे समोर ठेवीन असे मनोहर पर्रिकर यांनी सांगितले. व्हीव्हीआयपींसाठी खरेदी केलेल्या हॅलिकॉप्टरमध्ये कोणी लाच खाल्ली त्याचे उत्तर आधीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने द्यावे असे पर्रिकर शनिवारी म्हणाले होते.
कराराच्यावेळी सत्ता ज्यांच्या हातात होती त्यांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे. १२५ कोटी रुपये दिल्याचे इटालियन न्यायालयाने म्हटले असून, काहीजणांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. त्यावेळच्या सरकारने याचे उत्तर दिले पाहिजे असे पर्रिकर म्हणाले.