नवी दिल्ली: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी भाजपानं टीव्हीवरील जाहिरातींचा आधार घेतला आहे. विशेष म्हणजे भाजपानं मोठमोठ्या कंपन्यांना मागे टाकलं आहे. सध्याच्या घडीला टीव्हीवर सर्वाधिक जाहिराती भाजपाच्या आहेत. ब्रॉडकास्ट ऑडिसन्स रिसर्च काऊन्सिलच्या (बीएआरसी) आकडेवारीनुसार, १६ नोव्हेंबरला संपलेल्या आठवड्यात भाजपा पहिल्या स्थानी आहे. गेल्या आठवड्यात या यादीत विमल पान मसाला अव्वल होता. मागील आठवड्यात तब्बल २२०९९ वेळा भाजपाच्या जाहिराती दिसल्या. या यादीत नेटफ्लिक्स (१२९५१) आणि ट्रिवॅगो (१२७९५) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. भाजपानं टीव्हीवर इतक्या जाहिराती दिल्या आहेत की, पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकामध्ये जवळपास १० हजारांचं अंतर आहे. विशेष म्हणजे निवडणुकीत आव्हान देणारा प्रमुख पक्ष असलेला काँग्रेस जाहिरातीत पहिल्या दहामध्येही नाही.गेल्या आठवड्यात सर्वाधिक जाहिराती देणाऱ्या ब्रँड्सच्या यादीत भाजपाचा दुसरा क्रमांक होता. मात्र आता भाजपा अव्वल स्थानी आहे. या यादीत भाजपा, नेटफ्लिक्स, ट्रिवॅगो यांच्यानंतर संतूर सँडल अॅण्ड टर्मरिक, डेटॉल लिक्विड सोप, वाईप, कोलगेट डेन्टल क्रिम, डेटॉल टॉयलेट सोप्स, अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ, रुप मंत्रा आयुर फेस क्रिम यांचा क्रमांक लागतो.
अब की बार जाहिरातबाजी जोरदार; टीव्ही जाहिरातींमध्ये भाजपा अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 3:22 PM