नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी एकीकडे इंडिया आघाडी भाजपाविरोधात मजबूत होताना दिसतेय तर दुसरीकडे भाजपाप्रणित एनडीएतून एक एक पक्ष बाहेर पडताना दिसत आहेत. आता अभिनेता आणि नेता पवन कल्याणने गुरुवारी भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएतून बाहेर पडत टीडीपीचे समर्थन करण्याची घोषणा केली. आंधप्रदेशच्या विकासासाठी जनसेना आणि टीडीपी गरजेची आहे असं त्यांनी म्हटलं.
जनसेना प्रमुख पवन कल्याण म्हणाले की, टीडीपी एक मजबूत पक्ष आहे. आंध्र प्रदेशच्या सुशासन आणि विकासासाठी तेलुगु देशम पार्टीची गरज आहे. आज टीडीपी संघर्ष करत आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. या काळात टीडीपीला जनसैनिकांच्या युवकांची गरज आहे. जर टीडीपी आणि जनसेना एकत्र आली तर राज्यात वाएसआरसीपीची सरकार कोसळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेनंतर पवन कल्याण आंध्र प्रदेशातील वायएसआर जगमोहन रेड्डी यांच्या सरकारवर नाराज आहेत. जनसेना प्रमुख पवन कल्याण १४ सप्टेंबरला चंद्राबाबू नायडू यांना भेटण्यासाठी राजामुंडरीच्या सेंट्रल जेलला गेले होते. त्यानंतर १८ सप्टेंबरला दिल्लीत आयोजित NDA च्या बैठकीत पवन कल्याण सहभागी झाले होते. आम्ही भाजपाचे समर्थन करू असं त्या बैठकीनंतर पवन कल्याण यांनी म्हटलं होते. ते म्हणाले होते की, एनडीएची बैठक खूप चांगली झाली. या बैठकीत आत्मनिर्भर भारत यावर चर्चा झाली. आमच्या पक्षाकडून मी पंतप्रधान मोदींना आश्वासन दिले की आम्ही तुमच्यासोबत उभे राहू असं त्यांनी सांगितले होते.
पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेशात वायएसआरसीपी सरकारविरोधात लढण्यासाठी स्वत:चा पक्ष, एनडीए आणि टीडीपी यांना एकत्रित राहण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु आता पवन कल्याण यांनी एनडीए सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत पवन कल्याण यांच्या जनसेना पार्टीला ५.६ टक्के मतदानासह १ जागेवर विजय मिळवण्यास यश आले होते. तर टीडीपीला ३९.७ टक्के मतांसह २३ जागा मिळाल्या होत्या. तर वायएसआरसीपी ५०.६ टक्के मतदान मिळून १५१ जागा जिंकत सरकार स्थापन केले होते.
दरम्यान, अलीकडेच AIADMK यांनी भाजपाशी नाते तोडत एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. २०२४ च्या निवडणुकीसाठी आम्ही वेगळी आघाडी करू असं AIADMK प्रमुखांनी म्हटलं होते. २०२४ च्या निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच पक्ष आपापली रणनीती तयार करत आहेत. त्यात भाजपाविरोधी २८ पक्षांनी एकत्रित येत इंडिया आघाडीची स्थापना केली. इंडिया आघाडीच्या बैठका पाहता पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात भाजपानेही एनडीएची बैठक बोलावली होती. त्यात ३८ पक्ष सहभागी झाले होते. त्यातील आतापर्यंत २ पक्षांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.