पाटणा येथे होणाऱ्या बैठकीपूर्वी विरोधी पक्षांमध्ये मतभेद उफाळले, उपस्थित झाले हे प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 07:09 PM2023-06-21T19:09:24+5:302023-06-21T19:10:46+5:30
Opposition Parties Unity: २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपासमोर आव्हान उभं करण्यासाठी विरोधी पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. मात्र विरोधी ऐक्याच्या बाता मारणाऱ्या विरोधी पक्षांमध्ये अनेक मुद्यांवरून मतभेद उफाळून आले आहेत.
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपासमोर आव्हान उभं करण्यासाठी विरोधी पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. मात्र विरोधी ऐक्याच्या बाता मारणाऱ्या विरोधी पक्षांमध्ये अनेक मुद्यांवरून मतभेद उफाळून आले आहेत. एकीकडे अरविंद केजरीवाल हे केंद्र सरकारच्या अध्यादेशाबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट व्हावी, अशी मागणी करत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस ममता बॅनर्जी अरविंद केजरीवाल यांच्यासह इतर प्रादेशिक पक्षांना मतांमध्ये फूट पाडण्यापासून वाचण्याचा सल्ला देत आहे. एवढंच नाही तर काँग्रेस पक्ष मतांमध्ये फूट पाडून भाजपाला फायदा पोहोचवण्याऱ्या पक्षांची यादी तयार करत आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी ठरवण्यासाठी अनेक विरोधी पक्षांची २३ जून रोजी पाटणा येथे बैठक होणार आहे. या बैठकीत मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाचा सामना करण्यासाठीची ब्ल्यू प्रिंट समोर येऊ शकते. मात्र दिल्लीच्या राजकारणात येऊन दहा वर्षे झाली तरी मोदींच्या लोकप्रियतेत घट झालेली नाही. त्यामुळे मोदींना आव्हान देण्याचा विरोधी पक्षांचा मार्ग तितकासा सोपा नसेल. त्यामुळे त्यांच्यासमोर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
पंतप्रधान मोदींचं सर्वात मोठं बलस्थान आणि विरोधी पक्षांचा सर्वात कमकुवत दुवा म्हणजे प्रादेशिक पक्ष भाजपाला पराभूत करण्यात यशस्वी ठरत आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीत मोदींचा पराभव करण्याचा फॉर्म्युला विरोधी पक्षांना सापडलेला नाही. हे २०१९ पूर्वीही घडले होते. तसेच आताही तशीच परिस्थिती आहे. ममता बॅनर्जी, नितीश कुमार, राहुल गांधी, शरद पवार आणि अरविंद केजरीवाल यांच्यासारखे नेते पंतप्रधान बनण्याचं स्वप्न पाहत आहेत. मात्र मोदींच्या लोकप्रियतेचा सामना करणं त्यांना शक्य झालेलं नाही.
दुसरी बाब म्हणजे आप विरुद्ध काँग्रेस अशा होत असलेल्या लढाईचा आहे. आपने मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे काँग्रेस नाराज आहे. गुजरात आणि गोव्यामध्ये आपने मतं फोडल्यामुळे भाजपाचा फायदा झाला, असा काँग्रेसचा आरोप आहे. तसेच त्याची पुनरावृत्ती मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये होईल, असा दावाही काँग्रेसकडून केला जात आहे. मात्रा आम्ही मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये निवडणूक लढू नये असं वाटत असेल तर काँग्रेसने दिल्ली आणि पंजाबमध्ये निवडणूक लढवू नये, अशी मागणी आपकडून करण्यात येत आहे.