कोलकाता - तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत होत असल्याने बंगालमधील लोकसभेच्या मतदानाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मतदानाच्या सहाव्या टप्प्यादरम्यानही बंगालमधील मतदानाला हिंसेचे गालबोट लागले आहे. मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी बंगालमधील झारग्राम येथे भाजपाच्या एका बूथ कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. तसेच मरधारा येथील कांठीमध्ये टीएमसीच्या एका कार्यकर्त्याचा मृतदेह सापडला आहे. बंगालमधील आठ लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. मात्र मतदानापूर्वी येथे हिंसाचाराने डोके वर काढले आहे. बंगालमधील झारग्राम येथे भाजपाच्या एका कार्यकर्त्याचा मृतदेह सापडला आहे. रामोन सिंह असे या मृत कार्यकर्त्याचे नाव आहे. टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी त्याची हत्या केल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. मात्र पोलिसांनी हत्येचा दावा फेटाळून लावला आहे. दरम्यान, अन्य दोन भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला.
बंगालमध्ये सहाव्या टप्प्यातील मतदानालाही हिंसेचे गालबोट, भाजपा, टीएमसी कार्यकर्त्यांची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 9:55 AM