अहमदाबाद: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अहमदाबादमधल्या झोपड्यांसमोर भिंत उभारल्याची घटना ताजी असताना आता अशाच प्रकारचं आणखी एक वृत्त समोर आलं आहे. नव्या मोटेरा स्टेडियमच्या परिसरात राहणाऱ्या ४५ कुटुंबांना घरं रिकामी करण्याची नोटीस अहमदाबाद महानगरपालिकेनं पाठवली आहे. यासाठी संबंधितांना ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प २४ फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये येत आहेत. मोटेरा स्टेडियमजवळ असलेल्या ४५ झोपड्यांमध्ये जवळपास २०० जण वास्तव्यास आहेत. हे सर्व जण नोंदणीकृत बांधकाम मजूर आहेत. पुढील आठवड्यात होऊ घातलेल्या नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला घरं रिकामी करण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्याचा दावा रहिवाशांनी केला. गेल्या २० वर्षांपासून आपण याच भागात राहत असल्याचंदेखील त्यांनी सांगितलं. अहमदाबाद महापालिकेतल्या अधिकाऱ्यांनी मात्र रहिवाशांचा हा दावा फेटाळून लावला. रहिवाशांना पाठवण्यात आलेल्या नोटिशींचा ट्रम्प यांच्या कार्यक्रमाशी कोणताही संबंध नसल्याचं अधिकाऱ्यांना सांगितलं.रहिवाशींनी घरं उभारलेली जमीन महापालिकेच्या मालकीची असल्याचं नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे. 'तुम्ही ज्या भागावर अतिक्रमण केलं आहे, ती जमीन महापालिकेची असून शहर रचना योजनेच्या अंतर्गत येते,' असं पालिकेनं नोटिशीत म्हटलं आहे. रहिवाशांना घरं रिकामी करण्यासाठी सात दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही मुदत २४ फेब्रुवारीला संपते. याच दिवशी ट्रम्प अहमदाबादमध्ये येणार आहेत. झोपडपट्टीवासीयांना नोटिशीविरोधात अपील करायचं असल्यास त्यांना उद्यापर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे.डोनाल्ड ट्रम्प यांच्या मोटेरा स्टेडियममधल्या कार्यक्रमाचा आणि झोपडपट्टीवासीयांना बजावण्यात आलेल्या नोटिशींचा कोणताही संबंध नसल्याचा दावा पालिकेच्या मोटेरा वॉर्डचे सहाय्यक शहर विकास अधिकारी किशोर वर्मा यांनी केला. रहिवाशांना पाठवण्यात आलेल्या नोटिशींवर वर्मा यांचीच स्वाक्षरी आहे. काही जण ट्रम्प यांच्या कार्यक्रमाचा फायदा घेऊ पाहत असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला.
Donald Trump's India Visit : डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याआधी ४५ कुटुंबांना घरं रिकामी करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 8:43 AM
Donald Trump's India Visit : ट्रम्प २४ फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये; घरं रिकामी करण्यासाठी ७ दिवसांची मुदत
ठळक मुद्देडोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.मोटेरा स्टेडियम परिसरातल्या ४५ कुटुंबांना घरं रिकामी करण्याच्या नोटिसारहिवाशांना पाठवण्यात आलेल्या नोटिशींचा आणि ट्रम्प यांच्या दौऱ्यांचा संबंध नाही; पालिकेचा दावा