गुजरातमधील अहमदाबादमध्ये बुधवारी रात्री उशिरा एक भीषण अपघात झाला. येथे जॅग्वार कारने नऊ जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादमधील इस्कॉन ब्रिजवर रात्री तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. येथे एक अपघात झाला होता, जो काही लोक उभे राहून पाहत होते. याच दरम्यान, 160 किमीच्या वेगाने एक जॅग्वार कार तिथे आली आणि उभ्या असलेल्या लोकांना चिरडले. या अपघातात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
दोन पोलीस हवालदारांचाही मृतांमध्ये समावेश आहेत. या अपघातात जॅग्वार कार 200 मीटरपर्यंत लोकांना चिरडत गेली. अपघातातील मृत्यूच्या किंकाळ्या दूरवर ऐकू येत होत्या. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन पोलिसांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघेही वाहतूक पोलिसात तैनात होते. त्याचवेळी, जॅग्वार कार चालकासह 15 जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृतांमध्ये बहुतांश विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यार्थी बोटाड आणि भावनगर येथून अहमदाबाद येथे शिकण्यासाठी आले होते. अपघाताची माहिती मिळताच मृत विद्यार्थ्यांचे नातेवाईकही रडत शवविच्छेदनगृहात पोहोचले. या अपघातात जॅग्वार कारचा चालकही जखमी झाला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादमधील इस्कॉन ब्रिजवर विद्यार्थी आणि आजूबाजूचे लोक रात्री फिरायला येतात. पुलाजवळ पोलीस चौकीही आहे. रात्री उशिरा काही विद्यार्थी पुलावरून पायी जात होते. दरम्यान, एक थार आणि डंपरची धडक झाली. अपघात पाहून विद्यार्थी तिथेच थांबले. यादरम्यान काही विद्यार्थ्यांनी जवळच्या पोलीस चौकीत फोन करून याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच दोन वाहतूक पोलिस घटनास्थळी पोहोचले. तितक्यात वेगाने कार आली आणि त्यांना चिरडलं.