Lok Sabha Election 2024 : (Marathi News) नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांच्या इंडिया आघाडीतील पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. काँग्रेसची घटकपक्षांसोबत जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहे. गुजरातमधील भरुच मतदारसंघाबाबत आप आणि काँग्रेसमधील मुद्दा अद्याप सुटलेला नाही. काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांची ही जागा, भावनिक असल्याचे सांगत आपला देण्यास काँग्रेस तयार नाही. दरम्यान, मी भरूचच्या जागेचा दावेदार आहे. आपचा उमेदवार येथून जिंकू शकत नाही. मी येथे सातत्याने मेहनत घेतली आहे, असा दावा अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल यांनी केला आहे.
फैजल पटेल यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी, "भरुच जागेबाबत मी पक्षाच्या हायकमांडशीही बोललो आहे. मी या जागेवरून लोकसभा निवडणूक लढवावी, अशी इच्छा माझी बहीण मुमताज हिचीही आहे. तिने १० जानेवारीलाच मला याबाबत सांगितले होते. ती संघटनेत काम करेल आणि मी लोकसभा निवडणूक लढवणार आहे", असे फैजल पटेल यांनी सांगितले. दरम्यान, फैजल यांनी काँग्रेसच्या कोट्यातील भरूचची जागाच मागितली नाही, तर या जागेसाठी त्यांची बहीण मुमताज नव्हे तर आपणच दावेदार असल्याचेही सांगितले आहे.
दुसरीकडे, भरुच जागेवर आप-काँग्रेसची चर्चा यशस्वी होत नसल्याच्या मुद्द्यावर मुमताज पटेल म्हणाल्या, "याबाबत तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, आम्ही कोणत्याही पक्षाचा प्रचार करणार नाही." याचबरोबर, काँग्रेसला भरूचची जागा न मिळाल्याच्या प्रश्नावर मुमताज म्हणाल्या, "फक्त माझ्याच नाही, तर हजारो कार्यकर्त्यांच्या हृदयाला तडा जाईल. मला आशा आहे की, हायकमांड या जागेबाबत विचारपूर्वक निर्णय घेईल. आम्ही त्यांच्या निर्णयाचा पूर्ण आदर करू. संपूर्ण काँग्रेस परिवार सोबत आहे. मी अहमद पटेल यांची मुलगी आहे, माझी विचारधारा काँग्रेसशी जोडलेली आहे, मी इथेच राहणार आहे. नाराज होऊन इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही".