५०० च्या नोटांवर महात्मा गांधींऐवजी बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांचा फोटो असलेल्या खोट्या नोटा दिल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. अहमदाबादमधील एका सराफा फर्मच्या मालकाची १.६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी चार संशयितांचा शोध सुरू असल्याचीही माहिती दिली.
मेहुल बुलियनचे मालक मेहुल ठक्कर यांच्या तक्रारीवरून २४ सप्टेंबर रोजी नवरंगपुरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेने दीपक राजपूत (३२), नरेंद्र यादव उर्फ नंदू (३६) आणि कल्पेश मेहता (४५) यांना अटक केली आहे. हे सर्व अहमदाबादचे रहिवासी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठक्कर यांना सांगण्यात आलं की, काही लोक २१०० ग्रॅम (२.१ किलो) सोनं खरेदी करू इच्छितात. २४ सप्टेंबर रोजी नवरंगपुरा येथील सीजी रोडवरील एका शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या अंगडिया (कुरिअर) फर्मला ते डिलिव्हर करायचं आहे.
अभिनेते अनुपम खेर यांचा फोटो आरोपींनी नोटांवर का छापला? याबाबत अधिकाऱ्यांनी विचारलं असता. आरोपींनी दिलेलं उत्तर ऐकून धक्का बसेल. राजपूतला खोट्या नोटा आणि चलनी नोटांमधील कायदेशीर फरक माहीत आहे. खोट्या नोटा छापल्यास कठोर दंड आकारला जाईल हे त्याला माहीत होतं, त्यामुळे या गोष्टीपासून वाचण्यासाठी त्याने खोट्या नोटांवर अभिनेत्याच्या फोटोचा वापर केला.
ठक्कर याने भरत जोशीसह कर्मचाऱ्यांमार्पत १.६ कोटी किमतीचं सोनं कुरिअर कार्यालयात पाठवलं, जेथे दोन आरोपी उपस्थित होते. कर्मचाऱ्यांनी सोनं दिलं आणि आरोपींनी जोशी यांना ५०० च्या २६ बंडलमध्ये रोख दिली, ज्याची किंमत १.३ कोटी असल्याचं त्यांनी सांगितलं.
तपासाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितलं की, आरोपींनी जोशी यांना मशीन वापरून रोख मोजण्यास सांगितलं. त्यानंतर सोनं घेऊन ते गायब झाले. जोशी यांनी मोजणी सुरू केली तेव्हा त्यांना त्या नोटा खोट्या असल्याचं आढळलं, त्या प्रत्येक नोटेवर अनुपम खेर यांचा फोटो होता. यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.