अहमदाबाद - गुजरातच्या अहमदाबादमध्ये एक चार मजली इमारत रविवारी (26 ऑगस्ट) रात्री कोसळल्याची घटना घडली आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तीन जणांना सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आलं आहे.
अहमदाबाद शहरातील ओढव परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. इमारत कोसळल्यानंतर परिसरातील लोकांनी पोलीस आणि अग्निशामक दलाला याबाबत तातडीने माहिती दिली. आत्तापर्यंत तिघांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात जवानांना यश आले आहे. मात्र दहापेक्षा अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.
चीफ फायर ऑफिसर राजेश भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चार मजली इमारतीत एकूण 32 फ्लॅट होते. ही इमारत जुनी असल्याने तेथील रहिवाशांना काही दिवसांपूर्वीच स्थानिक प्रशासनाने ही इमारत खाली करण्याची नोटीस दिली होती. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत