अहमदाबाद : सौर मालिकेबाहेरील ग्रहताऱ्यांच्या शोधासाठी नेड (एनईआयडी) या अत्याधुनिक उपकरणाच्या निर्मितीसाठी नासाच्या मिशनचे नेतृत्व अहमदाबादमध्ये जन्मलेल्या सुव्रथ महादेवन यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. ते पेनसिल्व्हानिया विद्यापीठात सहायक प्रोफेसर आहेत. आयआयटी-मुंबईचे विद्यार्थी राहिलेले महादेवन २०००मध्ये संशोधन अभ्यासासाठी अमेरिकेला गेले होते. ते सध्या अहमदाबाद भेटीवर आले आहेत. या प्रकल्पाबाबत माहिती देताना ते म्हणाले की, नेडची बांधणी २०१९मध्ये पूर्ण होईल. अरिझोना येथे ३.५ मीटर डब्ल्यूआयवायएन दुर्बिणीवर हे उपकरण लावले जाईल. या प्रकल्पासाठी अमेरिकेने ९७ लाख डॉलर्सचा निधी दिला आहे. ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे ताऱ्यांवर होणारे सौम्य कंपन (शास्त्रीय नाव वोबल) मोजण्याचे काम या उपकरणाद्वारे केले जाईल. गुरू ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणामुळे सूर्यावर दर सेंकदाला १२ मीटर वेगाने कंपन होते. पृथ्वी सूर्याभोवती फिरल्यामुळे होणारे कंपन दर सेंकदाला अवघे १० से.मी. असते. या अवघ्या काही मिनिटांतील बदल सदर उपकरणाद्वारे मोजले जातील, अशी माहिती महादेवन यांनी दिली आहे. (वृत्तसंस्था)गत दोन दशकांपासून शास्त्रज्ञांनी सौरमालिकेबाहेरील तीन हजारांवर ग्रहांचा शोध लावला असला तरी पृथ्वीसारखे जीवन कुठेही आढळले नाही. अद्याप अनेक अज्ञात ग्रहांचा शोध लागलेला नाही. ही अवघड जबाबदारी असली तरी नव्या शोधांबाबत आम्ही आशावादी आहोत. - सुव्रथ महादेवन, नासाचे मिशनप्रमुख
अहमदाबादचा शास्त्रज्ञ नासा मिशनचा ‘कर्णधार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2016 4:28 AM