चेन्नई: तमिळनाडूत पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि एआयएडीएमके पक्षानं कंबर कसली आहे. आज गृहमंत्री अमित शहांनी तमिळनाडूचा दौरा करत मुख्यमंत्री पलानीस्वामींची भेट घेतली. यानंतर दोन्ही पक्षांनी विधानसभा निवडणूक एकत्र लढवण्याची घोषणा केली. अमित शहा, मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.आमचा पक्ष २०२१ मध्ये भाजपसोबत निवडणूक लढवेल आणि जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्री पलानीस्वामींनी व्यक्त केला. तमिळनाडू पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठिशी उभी राहील, असंदेखील ते म्हणाले. अमित शहा दोन दिवसांच्या तमिळनाडू दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज चेन्नईत ६७ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं भूमिपूजन केलं. आधीच्या डीएमके-काँग्रेस सरकारनं तमिळनाडूची उपेक्षा केल्याची टीका शहांनी केली. पंतप्रधान मोदी तमिळनाडूला करत असलेली मदत त्यांच्या हक्काची आहे, असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं.मोदी सरकार तमिळनाडूसोबत अतिशय ठामपणे उभं आहे. तमिळनाडूच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही शहांनी दिली. राज्यातल्या ४५ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४ हजार ४०० कोटी रुपये सरकारनं जमा केले. ग्रामीण सहकारी बँक आणि आरआरबीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ३० हजार कोटी रुपये देण्यात आली आहेत, असं शहांनी सांगितलं.