'सिद्धू पक्षापेक्षा मोठे नाहीत, आता कारवाई आवश्यक', पंजाब काँग्रेसच्या प्रभारींचे सोनिया गांधींना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 06:19 PM2022-05-02T18:19:55+5:302022-05-02T18:21:51+5:30
पक्षविरोधी कारवाया आणि सतत वक्तव्य केल्याबद्दल नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : पंजाबकाँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) प्रभारी हरीश चौधरी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून केली आहे. पक्षविरोधी कारवाया आणि सतत वक्तव्य केल्याबद्दल नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
हरीश चौधरी यांनी इंडिया टुडे-आज तकला सांगितले की, ही आमच्या पक्षाची अंतर्गत बाब आहे. आम्ही काँग्रेस हायकमांडला नवज्योत सिंग सिद्धू यांच्याविरोधात अनुशासनहीनतेबाबत पत्र लिहिले आहे. आम्ही नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये, याचे स्पष्टीकरण मागावे अशी शिफारस केली आहे, असे हरीश चौधरी यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे कौतुक केले होते. तसेच, काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांनी माफियांविरोधात कोणतीही कारवाई न केल्यामुळे पंजाबच्या जनतेने बदलाची संधी दिल्याचे नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले होते. ते म्हणाले होते की, "माझा लढाही माफियांविरुद्ध आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे माझे धाकटे भाऊ आणि प्रामाणिक आहे. भगवंत मान यांनी माफियांविरुद्ध काहीतरी करण्याची गरज आहे."
दरम्यान, पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू हे नाराज असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पंजाब काँग्रेसचे नवे अध्यक्ष अमरिंदरसिंग राजा वडिंग यांच्या समारंभात नवज्योत सिंग सिद्धू यांनी हजेरी लावली. मात्र, त्यांनी नव्या प्रमुखांसोबत स्टेज शेअर केला नाही. अमरिंदर सिंग राजा वडिंग यांनी स्वतः नवज्योत सिंग सिद्धू यांना निमंत्रण दिले होते. त्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसला बदलाची गरज असून पंजाब काँग्रेसचे नवे प्रमुख युवा आयकॉन असल्याचे विधान केले. दरम्यान, नवज्योतसिंग सिद्धू यांनी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या नेत्यांचीही बैठक घेतली आहे.