Rajya Sabha Election: ६ लाख मतांनी पराभूत झालेल्या व्यक्तीवर पक्ष मेहरबान का?; सोनिया गांधींना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 04:39 PM2022-05-31T16:39:43+5:302022-05-31T16:40:06+5:30
मुरादाबाद येथून ६ लाखांच्या मतांनी हरल्यानंतरही इम्रान प्रतापगढी यांना अल्पसंख्याक विभागाचं राष्ट्रीय अध्यक्षपद दिले. अलीकडेच ते पक्षाशी जोडले. मुरादाबाद येथे ६ लाख मतांनी पडले. आतापर्यंत एकही नगरपालिका निवडणूक जिंकली नाही.
नवी दिल्ली - राज्यसभा निवडणुकीच्या पूर्वीच काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात खदखद बाहेर पडत आहे. राज्यसभेत काँग्रेसनं दिलेल्या उमेदवारीवरून पक्षाच्या अनेक नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. आता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य विश्वबंधू राय यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी(Sonia Gandhi) यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. त्याआधी पवन खेडा, नगमा आणि पृथ्वीराज चव्हाण यांनीही राज्यसभेचं तिकीट न मिळाल्याने विरोध दर्शवला आहे.
काँग्रेसनं राज्यसभा निवडणुकीसाठी १० उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. पार्टीने पी चिंदबरम यांना तामिळनाडू, जयराम रमेश यांना कर्नाटक, राजीव शुक्ला छत्तीसगड, प्रमोद तिवारी राजस्थान आणि इम्रान प्रतापगढी(Imran Pratapgadhi) यांना महाराष्ट्रातून उमेदवारी दिली आहे. विश्वबंधू राय यांनी महाराष्ट्राच्या कोट्यातून इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिल्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. सोनिया यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, दिल्लीत बोझा-बिस्तरा उचलणाऱ्यांना मुख्यपदावर नियुक्त केले जाते.
मुरादाबाद येथून ६ लाखांच्या मतांनी हरल्यानंतरही इम्रान प्रतापगढी यांना अल्पसंख्याक विभागाचं राष्ट्रीय अध्यक्षपद दिले. अलीकडेच ते पक्षाशी जोडले. मुरादाबाद येथे ६ लाख मतांनी पडले. आतापर्यंत एकही नगरपालिका निवडणूक जिंकली नाही. तरीही अल्पसंख्याक विभागाचं अध्यक्षपद सोपवले आणि आता राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. एका व्यक्तीवर पक्षाची एवढी मेहरबानी का? यांच्या शायरीत इतकी खुबी आहे की अन्य योग्य नेत्यांच्या कतृत्वाचा विसर पडेल? असा सवाल त्यांनी विचारला.
यापुढे पत्रात लिहिलंय की, याचप्रकारे पंजाबमध्ये नवज्योत सिंग सिद्धूला प्रदेशाध्यक्ष बनवण्याची चुकी केली. सिद्धूही इम्रानप्रमाणे शायरी करत होते. पक्षाचं पद मिळवण्यासाठी शायरी येणं गरजेचे आहे का? महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस नेते अपमानित होत आहेत. आता पक्षाचे नेतृत्वही त्यांच्याकडे पाहत नाहीत असं त्यांनी सांगितले आहे.
AICC member Vishwabandhu Rai wrote a letter to Congress chief Sonia Gandhi, expressing displeasure over sending Imran Pratapgarhi (Congress Minority Dept chairman) for Rajya Sabha polls with Maharashtra quota. pic.twitter.com/FiN1Z3ti5z
— ANI (@ANI) May 31, 2022
डॉ. आशिष देशमुखांचा राजीनामा
राज्यसभा उमेदवारीत शब्द न पाळल्याने नाराज झालेले डॉ. आशिष देशमुख काँग्रेसमध्ये पदाचा राजीनामा देत असले तरी पक्षात राहून काम करणार असल्याचं त्यांनी जाहीर केले आहे. महाराष्ट्रात अनेक सक्षम उमेदवार असताना पक्षाने राज्याबाहेरचा उमेदवार दिल्याने ही नाराजी आहे. भाजपातून बाहेर पडल्यानंतर देशमुखांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यासाठी त्यांनी आमदारकीही पणाला लावली. खुद्द पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशमुखांना राज्यसभेच्या जागेचं आश्वासन दिले होते मात्र ते पाळलं नाही असा दावा त्यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.