जोशीमठ बाधितांना दीड लाखांची मदत; स्थानिकांचे मन वळविण्याचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 07:42 AM2023-01-12T07:42:56+5:302023-01-12T07:43:08+5:30
बाधित नागरिक पाडापाडी सुरू होण्यापूर्वी बद्रीनाथच्या धर्तीवर नुकसान भरपाईची मागणी करत आहेत.
डेहराडून : उत्तराखंडमधील जोशीमठ येथील दोन आलिशान हॉटेल्स पाडण्यास विरोध करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांचे आणि स्थानिकांचे मन वळवण्यासाठी बुधवारी प्रशासनाकडून नव्याने प्रयत्न करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या सचिव मीनाक्षी सुंदरम आणि आंदोलक यांच्यात चर्चेची एक नवीन फेरी पार पडली.
बाधित नागरिक पाडापाडी सुरू होण्यापूर्वी बद्रीनाथच्या धर्तीवर नुकसान भरपाईची मागणी करत आहेत. ‘मलारी इन’ आणि ‘माउंट व्ह्यू’ ही हॉटेल्स धोकादायकपणे एकमेकांकडे झुकत आहेत, ज्यामुळे इमारतींच्या आजूबाजूच्या मानवी वसाहतींना धोका निर्माण झाला आहे. उत्तराखंड सरकारने सोमवारी या दोन इमारतींपासून सुरुवात करून अस्थिर संरचना पाडण्याचे निर्देश दिले होते.
सरकारी भरपाईवर नाखूश
जमीन खचण्यामुळे घरांचे नुकसान झालेल्यांना राज्य सरकारने दीड लाख रुपयांची भरपाई दिली असून, ती लोकांनी फेटाळली आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री पुष्कर धामी हे स्थानिक लोकांना सुरक्षेचा विश्वास दर्शविण्यासाठी व प्रत्येक समस्येवर तोडगा काढण्यासाठी बुधवारी रात्रभर जोशीमठमध्ये तळ ठोकून होते.
घटना का घडली?
सुमारे १२ वर्षांपूर्वीच्या एक जलविद्युत प्रकल्पासाठी जमिनीत बोगदा तयार करताना एक मोठी टनल बोरिंग मशीन जोशीमठजवळ अचानक फसली. जमिनीत साचलेले पाणी यावेळी वाहू लागले. अनेक महिने उलटले तरी पाणी थांबले नाही. पाणी वाहून गेल्यामुळे पर्वत पोकळ झाला. आता जोशीमठ खचण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही, असे पद्म पुरस्काराने सन्मानित पर्यावरणतज्ज्ञ डॉ. अनिल पी. जोशी यांनी सांगितले.