नवी दिल्ली : कोरोना व्हायसरची तिसरी लाट येत्या सहा ते आठ आठवड्यांत भारतात येण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती एम्सचे (AIIMS ) प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी दिली आहे. कोरोनाची तिसरी लाट टाळता येत नाही, असेही त्यांनी सूचित केले आहे. मार्चअखेर सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या टप्प्यानंतर देशाच्या बर्याच भागात अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, तज्ज्ञांनी गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत इशारा दिला होता. (aiims director randeep guleria said third wave of corona may come in next 6 to 8 weeks report)
डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी 'एनडीटीव्ही'शी चर्चा केली. यावेळी ते म्हणाले, 'आता आम्ही अनलॉक करणे सुरू केले आहे, परंतू पुन्हा कोविडशी संबंधित व्यवहारांचा अभाव दिसत आहे. पहिल्या आणि दुसर्या लाट दरम्यान जे घडले, त्यावरून आपण काही शिकलो आहोत असे दिसत नाही. लोक पुन्हा एकत्र येऊ लागले आहेत... लोक एकत्र येत आहेत. परंतु पुढील 6 ते 8 आठवड्यांत कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते ... किंवा कदाचित याला थोडासा वेळ लागू शकेल.' याचबरोबर, ते म्हणाले, 'आम्ही कोविडशी संबंधित नियम कसे हाताळत आहोत आणि गर्दी टाळत आहोत यावर अवलंबून आहे.'
महाराष्ट्रात जास्त धोका!नुकत्याच झालेल्या एनडीटीव्हीच्या एका रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, महाराष्ट्रात अंदाज बांधलेल्या वेळेआधीच कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गठित तज्ज्ञ समितीने ही माहिती दिली. तज्ज्ञ म्हणाले होते की, राज्यातील अनेक भागात कोरोना नियम शिथिल गेल्यानंतर गर्दी दिसून आली आहे. अशा परिस्थितीत कोरोना प्रकरणांची संख्या पटकन वाढू शकते. तसेच, रिपोर्टनुसार, तज्ज्ञांनी असा इशारा दिला होता की, तिसऱ्या लाटेत राज्यात आठ लाख कोरोनाची अॅक्टिव्ह प्रकरणे येऊ शकतात.
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टमध्ये रायटर्सच्या सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, ऑक्टोबरपर्यंत देशात तिसरी लाट येऊ शकते. या सर्वेक्षणात जगभरातील 40 तज्ज्ञ, डॉक्टर, वैज्ञानिक, साथीचे रोगशास्त्रज्ञ आणि प्राध्यापकांकडून माहिती घेण्यात आली. त्यानुसार, तिसऱ्या लाटेपर्यंत अधिकाधिक लोकांना लसीकरण करून लाट नियंत्रित केली जाऊ शकते. तसेच, दुसर्या लाटेच्या तुलनेत संभाव्य तिसर्या लाटेत ही प्रकरणे कमी आहेत, असेही म्हटले आहे.
मुलांवर परिणाम होणार नाही! अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था आणि जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या अभ्यासानुसार, मुलांमध्ये हाय सीरो-पॉझिटिव्हिटी असल्याचे दिसून आले आहे. यामुळे असे म्हटले जात आहे की तिसऱ्या लाटेचा फारसा परिणाम मुलांवर होणार नाही.