नवी दिल्ली: आज डॉक्टर्स दिन साजरा केला जात आहे. डॉक्टर्स करत असलेल्या रुग्णसेवेबद्दल त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. तर नवी दिल्लीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एम्स आणि सफदरजंग रुग्णालयातील ज्युनियर रेसिडंट डॉक्टर्सना मारहाण झाली आहे. एका धाब्यावर हा संपूर्ण प्रकार घडला. यामध्ये अनेक डॉक्टरांना गंभीर इजा झाली आहे. अद्याप या प्रकरणी एफआयआर दाखल झालेला नाही. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
एम्स आरडीएचे अध्यक्ष डॉ. अमनदीप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाण झालेले ज्युनियर रेजिडंट डॉक्टर्स आपत्कालीन सेवा देत होते. ड्युटी संपवून ते रात्री उशिरा एम्सच्या जवळ असलेल्या गौतम नगर ढाब्यावर पराठे खायला गेले. त्यावेळी सफदरजंग रुग्णालयाचे ज्युनियर डॉक्टर्सदेखील तिथे पोहोचले. त्यावेळी तिथे असलेल्या ढाबा मालकानं डॉक्टरांबद्दल अपमानास्पद आणि आक्षेपार्ह विधानं केली. डॉक्टरांमुळे कोरोना पसरतो. जिथे डॉक्टर्स राहतात, तिथे कोरोना पसरतो, असं ढाबा मालक म्हणाला. त्यानंतर डॉक्टर आणि ढाबा मालकामध्ये वाद झाला.
डॉक्टरांसोबत वाद झाल्यानंतर ढाब्याच्या मालकानं १५ ते २० मुलं बोलावली. त्यांच्याकडे रॉड आणि काठ्या होत्या. त्यांनी ज्युनियर डॉक्टरांना मारहाण करण्यास सुरुवात केली. काही डॉक्टरांच्या डोक्यावर रॉडनं हल्ला करण्यात आला. त्यामुळे त्यांना टाके पडले आहेत. काहींच्या पायाला, तर काहींच्या मानेला दुखापत झाली आहे. सुदैवानं सर्व डॉक्टरांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या जिवाला कोणताही धोका नाही.
डॉक्टरांसोबत घडलेला प्रकार, त्यांनी मिळालेली वागणूक अस्वीकारार्ह असल्याचं डॉक्टर सिंह म्हणाले. 'डॉक्टर्स आपत्कालीन ड्युटीवर होते. ते लोकांचा जीव वाचवत आहेत. कित्येक दिवस ते घरीदेखील जात नाहीत. स्वत:च्या कुटुंबापासून दूर राहत आहेत. त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण आहे. बऱ्याचदा त्यांना पुरेशी विश्रांतीदेखील मिळत नाहीत,' असं सिंह यांनी सांगितलं.