नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाला मोठा तडाखा दिला. हळूहळू कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. नव्या कोरोनाबाधितांची संख्या घटत असली, तरी मृत्यूचे वाढते प्रमाण चिंतेत भर घालत आहे. कोरोनासह काळ्या आणि पांढऱ्या बुरशीचा आजारही देशभरात थैमान घालताना दिसत आहे. आतापर्यंत हजारोंना याची लागण झाली आहे. मात्र, ब्लॅक फंगस आजार स्पर्शाने पसरत नाही. तसेच या आजाराला वेगळ्या रंगांवरून नवीन ओळख देऊ नये, अशी सूचना एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केली आहे. (aiims dr randeep guleria says mucormycosis black fungus not infects like corona)
डॉ. गुलेरिया यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काळ्या बुरशीचा आजार म्हणजेच ब्लॅक फंगसविषयी सूचना केल्या. ब्लॅक फंगस आजार स्पर्शामुळे पसरत नाही. तसेच वेगळ्या रंगांवरून ओळख देण्यात काहीच अर्थ नाही, असे डॉ. गुलेरिया यांनी सांगितले आहे. याशिवाय डॉ. गुलेरिया यांनी या आजाराची लक्षणे आणि करावयाच्या उपाययोजना यांविषयी माहिती दिली.
माऊंट एव्हरेस्टवर १०० जणांना कोरोनाची लागण? गाइडचा दावा, नेपाळ सरकारचा इन्कार
लक्षणे आणि उपाययोजना
ब्लॅक फंगस आजार होऊ नये, यासाठी स्वच्छता अधिक महत्त्वाची आहे. घर, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. तसेच पाणी उकळूनच प्यावे. शक्य असल्यास उकळवलेले गरम पाणी पिण्यावर भर द्यावा, असेही ते म्हणाले. तसेच नाकात दुखणे किंवा घसा खवखवणे, पोटात दुखणे अशी काही लक्षणे ब्लॅक फंगस आजाराची समोर आल्याचे सांगत रंगांपेक्षा लक्षणांवर भर देऊन शक्य तितक्या उपचार करण्यावर भर द्यावा, असेही डॉ. गुलेरिया यांनी सांगितले.
“तुमचा कार्यकाळ संपू दे, मग तुरुंगातच पाठवतो”; टीएमसी खासदाराने राज्यपालांना धमकावले
देशभरात ५ हजार रुग्ण
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी याबाबत माहिती दिली आहे. २४ मे रोजी देशातील एकूण १८ राज्यांमध्ये ब्लॅक फंगसचे एकूण ५ हजार ४२४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. तसेच गुजरातमध्ये २ हजार १६५, महाराष्ट्रात १ हजार १८८, उत्तर प्रदेशात ६६३, मध्य प्रदेशात ५१९, हरियाणात ३३९ आणि आंध्र प्रदेशात २४८ म्युकोरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत.