नवी दिल्ली : हैदराबादेतील व्हेटेर्नरी डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून नंतर तिला जाळून मारणाऱ्या घटनेतील चार आरोपींच्या मृतदेहाची दुसरी उत्तरीय तपासणी करण्यासाठी एम्स रुग्णालयाने तीन न्यायसहायक डॉक्टरांचे पथक स्थापन केले आहे. ६ डिसेंबर रोजी पोलिसांसोबत झालेल्या एन्काऊंटरमध्ये हे आरोपी ठार झाले होते.
एम्सच्या सूत्रांनी सांगितले की, एम्समधील न्यायसहायक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली हे पथक दुसरे शवविच्छेदन करील. डॉ. आदर्शकुमार आणि डॉ. अभिषेक यादव हे या पथकातील इतर दोन सदस्य आहेत. ते शवविच्छेदन करतील. डॉ. वरुण चंद्रा त्यांना निष्कर्ष काढण्यासाठी साह्य करतील. एम्सने तेलंगणाच्या विशेष मुख्य सचिवांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, हैदराबाद येथील सरकारी मालकीच्या गांधी हॉस्पिटलमध्ये २३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वा. हे शवविच्छेदन होईल. हे पथक २२ डिसेंबर रोजीसायंकाळी ५.१५ वा. तेलंगणाला रवाना होईल.न्यायालयाचे काय आहेत आदेश?तेलंगणा उच्च न्यायालयाने चारही आरोपींचे दुसरे शवविच्छेदन करण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाच्या आधीच्या आदेशानुसार, मृतदेह गांधी हॉस्पिटलमध्ये जतन करून ठेवण्यात आले आहेत.आरोपींना बनावट एन्काऊंटरमध्ये मारण्यात आल्याचा आरोप करणाºया याचिका उच्च न्यायालयात दाखल झालेल्या असून, त्यांच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने वरील आदेश दिले होते. २३ डिसेंबरपूर्वी दुसरे शवविच्छेदन करून अहवाल उच्च न्यायालयाच्या निबंधकांकडे सादर करण्यात यावा, असे खंडपीठाने म्हटले होते.दुसऱ्यांदा शवविच्छेदन झाल्यानंतर आरोपींचे मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात येणार आहेत. पुराव्याच्या आधारे स्वतंत्र मत देण्याचे आदेश डॉक्टरांना देण्यात आले आहेत.