काँग्रेस नेते आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (रविवार) जयपूर येथे मोठी घोषणा केली. देशात २०१४ पासून हिंदूंचे राज्य आहे, आपल्याला पुन्हा एकदा हिंदूंचे राज्य आणायचे आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल यांच्या या वक्तव्यावर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम)चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी थेट प्रतिक्रिया देत हल्लाबोल केला आहे. तुम्हीच हिंदुत्वासाठी मैदान तयार केले, असे ओवेसी यांनी म्हटले आहे. (Asaduddin Owaisi on Rahul Gandhi)
राहुल गांधी यांच्या घोषणेवर ट्विट करत असदुद्दीन ओवेसी म्हणाले, "राहुल आणि काँग्रेसनेच हिंदुत्वासाठी जमीन तयार केली आहे. आता ते बहुसंख्यवादाचे पीक घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदूंना सत्तेत आणणे हा 2021 साठीचा एक 'धर्मनिरपेक्ष' अजेंडा झाला आहे. वा! भारत सर्व भारतीयांचा आहे. एकट्या हिंदूंचा नाही. भारत सर्व धर्मांच्या लोकांचा आहे आणि जे धर्मावर विश्वास ठेवत नाहीत, त्यांचाही आहे. "
राहुल गांधी यांनी आज जयपूर येथे 'महागाई हटाओ रॅली'ला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, "हा देश हिंदूंचा देश आहे, हिंदुत्ववाद्यांचा नाही. देशात महागाई असेल, त्रास असेल, तर हे काम हिंदुत्ववाद्यांनी केले आहे. हिंदुत्ववाद्यांना कोणत्याही स्थितीत सत्ता हवी आहे." हिंदू आणि हिंदुत्व हे दोन्ही भिन्न असल्याचे सांगत राहुल म्हणाले, ज्याप्रमाणे दोन जीवांचा एक आत्मा असू शकत नाही, त्याचप्रमाणे दोन शब्दांचा एकच अर्थ असू शकत नाही, कारण प्रत्येक शब्दाचा वेगळा अर्थ होत असतो.
'मी हिंदू आहे, पण हिंदुत्ववादी नाही...' - राहुल गांधी पुढे म्हणाले, "मी हिंदू आहे, पण हिंदुत्ववादी नाही. हे सर्व हिंदू आहेत पण हिंदुत्ववादी नाहीत. आज मला तुम्हाला हिंदू आणि हिंदुत्ववादी यातील फरक सांगायचा आहे. महात्मा गांधी हिंदू, गोडसे हिंदुत्ववादी. काहीही झाले तरी हिंदू सत्याचा शोध घेतो. गर पडली तर तो त्यासाठी जीवाचीही परवा करत नाही, तो सत्याचा शोध घेतो. त्याचा मार्ग सत्याग्रहाचा आहे. तो संपूर्ण जीवन सत्याच्या शोधात घालवतो. महात्मा गांधींनी माय एक्सपिरियन्स विथ ट्रुथ हे आत्मचरित्र लिहिले, म्हणजे त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सत्य समजून घेण्याच्या प्रयत्नात घालवले आणि शेवटी एका हिंदुत्ववाद्याने त्यांच्या छातीवर तीन गोळ्या झाडल्या, असेही राहुल म्हणाले.