Asaduddin Owaisi: एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी एका जनसभेला संबोधित करताना केंद्रातील मोदी सरकारला खुले आव्हान दिले आहे. हिंमत असेल तर चीनवर सर्जिकल स्ट्राइक करून दाखवावा, असे असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. तेलंगणा येथील आदिलाबाद येथे ओवेसी यांची एक जाहीर सभा झाली.
ते (अमित शाह) म्हणतात की, जुन्या शहरात सर्जिकल स्ट्राइक करू. मग आम्ही काय बांगड्या भरल्या आहेत का, असा इशारा ओवेसी यांनी दिला. जर भाजपकडे एवढी ताकद आहे, तर त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार चीनवर सर्जिकल स्ट्राइक का करत नाही. भाजपने मंदिरांसाठी कोट्यवधी रुपये मंजूर केले आणि त्यानंतरही माझ्यावर आरोप करतात की, मुस्लिमांचे तुष्टीकरण केले जात आहे. मंदिरांना पैसे दिले जातात यावर तेलंगणातील मुस्लिमांचा आक्षेप नाही. आक्षेप यावर आहे की, पैसे द्यायचेच असतील तर प्रत्येकाला पैसे द्या, फक्त एकाचा धर्माला देऊ नका, या शब्दांत ओवेसी यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
बीआरएस सरकारने राज्यात ब्राह्मण सदन बांधले
सत्ताधारी बीआरएस सरकारने राज्यात ब्राह्मण सदन बांधले, मात्र आजपर्यंत इस्लामिक सेंटर बनवले गेले नाही. एका पोलीस कर्मचाऱ्याने बुरखा घातलेल्या मुस्लिम महिलेला थप्पड मारली, त्यावरही राज्य सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. याउलट, त्या मुलीवर गुन्हा दाखल झाला. आता ही हद्द झाली. हा कुठला न्याय? तरीही भाजप आमच्यावर आरोप करत आहे, असे ओवेसी म्हणाले.
दरम्यान, ओवेसींचे नाव घेऊन भाजपवाल्यांना त्यांचे पोट भरायचे असेल तर मला यात काही आक्षेप नाही. त्यांना हे करायचे असेल तर ते करू शकतात, आम्हाला त्यात काही अडचण नाही, असा टोलाही ओवेसी यांनी लगावला.