AIMIM Asaduddin Owaisi: सध्या महाराष्ट्रात लाऊडस्पीकर आणि हनुमान चालिसेवरुन सुरू झालेला गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाहीय. औरंगाबादमध्ये रविवारी(दि.1) झालेल्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला 3 मेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. 4 मेपासून मशिदींसमोर हनुमान चालीसा पठण करणार, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यावर आता एआयएमआयएम(AIMIM) प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी टीकास्त्र डागले.
राज ठाकरे यांना इशारा देताना असदुद्दीन औवेसी म्हणाले की, "राज ठाकरे यांचे भाषण म्हणजे हिंसेला निमंत्रण आहे. याची पोलिस स्वत:हून दखल का घेत नाहीत? महाराष्ट्र मोठा की राज ठाकरे मोठे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान करणाऱ्या नवनीत आणि रवी राणा यांच्यावर कारवाई होऊ शकते, तर राज ठाकरेंवर कारवाई का होऊ शकत नाही? त्यांना तुरुंगात टाकले तरच त्यांचे डोके थंड होईल", अशी टीका त्यांनी केली.
महाराष्ट्राला दिल्ली बनवायचे आहे का?औवेसी पुढे म्हणतात की, राज ठाकरेंचें भाषण म्हणजे हिंसाचाराला खुली हाक आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आपल्याच भावावर कारवाई करायची नाही, मग राष्ट्रवादी काय करत आहे? तुम्हाला महाराष्ट्राला दिल्ली बनवायचे आहे का? असा सवालही त्यांनी केला. तसेच, महाराष्ट्रातील सरकार आंधळे सरकार आहे. यामुळे सध्या संपूर्ण मुस्लिम समाजात अस्वस्थता पसरली आहे, असेही ते म्हणाले.