एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी हैदराबाद येथे नमाजनंतर भाषण देताना भावूक झाले आणि त्यांना रडू कोसळले. यावेळी ते म्हणाले, खरगोन येथे मुस्लिमांची घरे पाडण्यात आली. जहांगीरपुरी येथेही मुस्लिमांवर अत्याचार झाले, त्यांची दुकाने पाडली गेली, हेही खरे आहे.
ओवेसी म्हणाले, मी म्हणतो, धीर सोडू नका. दुष्टांनो ऐका, मी मृत्यूला घाबरत नाही. आम्ही तुमच्या अत्याचाराला घाबरणार नाही. आम्ही मृत्यूला घाबरणार नाही. आम्ही तुमच्या सत्तेला घाबरणार नाही. आम्ही संयमाने घेऊ, पण मैदान सोडणार नाही.
ओवेसी यांनी नुकताच, राजस्थानमधील अलवर येथील 300 वर्ष जुने मंदिर पाडल्यावरून भाजपवर निशाणा साधला होता. यासंदर्भात ट्विट करत ओवेसी म्हणाले होते, भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेने राजस्थानातील राजगड येथील एक पुरातन मंदिर पाडण्याचा घेतलेला निर्णय निंदनीय आहे. आमचा सर्व धर्मांच्या धर्मिक स्वातंत्र्यावर विश्वास आहे आणि ही एक गंभीर गोष्ट आहे. आशा आहे, की सर्वच प्रार्थना स्थळांवरील हल्ल्यांबद्दल भाजप आणि आरएसएस माफी मागतील.