Asaduddin Owaisi On Gyanvapi Case: ज्ञानवापी परिसरात असलेल्या व्यास तळघरात हिंदूना पूजा करण्याचा अधिकार देण्याचा महत्त्वपूर्ण निकाल वाराणसी जिल्हा न्यायालयाने दिला. हिंदू पक्षाने न्याय मिळाल्याचे सांगत या निकालाचे स्वागत केले. वाराणसी जिल्हा न्यायालयाने निकाल दिल्यानंतर ज्ञानवापीमध्ये रात्री उशिरा पूजन करून दिवे प्रज्ज्वलित करण्यात आले. यावरून आता एआयएमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी या निकालावर नाराजी व्यक्त केली आणि पुन्हा ०६ डिसेंबर होण्याची शक्यता असल्याचा दावा केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना ओवेसी म्हणाले की, जिल्हा न्यायाधीशांचा सेवेतील शेवटचा दिवस होता. मात्र, हा निकाल पूर्वनिर्धारित होता. आधीच ठरवलेला होता. १९९३ पासून वादग्रस्त जागेवर काहीच होत नव्हते. आता मात्र मशिदीचे तळघर हिंदू पक्षाला देण्याचे काम या निकालाने केले आहे. हा जवळपास सर्वच प्रकरणावर निकाल दिल्यासारखे आहे, अशी टीका ओवेसी यांनी केली.
पुन्हा ०६ डिसेंबर होण्याची शक्यता
वाराणसी न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दिलेला निर्णय १९९२ च्या प्रार्थनास्थळ कायद्याचे उल्लंघन करणारा आहे. जोपर्यंत हे सरकार आपले मौन तोडत नाही आणि पूजा स्थळ कायद्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करणार नाही, तोपर्यंत हे असेच चालू राहील. या देशात ६ डिसेंबरला पुन्हा घडू शकते, अशी भीती ओवेसी यांनी व्यक्त केली.
दरम्यान, जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांनी पूजा करण्याची जबाबदारी काशी विश्वनाथ ट्रस्टकडे दिली आहे. यानंतर काशी विश्वनाथ मंदिराचे मुख्य पुजारी ओम प्रकाश मिश्रा आणि अयोध्येतील रामललाच्या अभिषेकासाठी शुभ मुहूर्त ठरवणारे गणेश्वर द्रविड यांनी व्यास तळघरात पूजा केली. न्यायालयाच्या आदेशानंतर तळघरातील बॅरिकेड्स हटवण्यात आले. यानंतर पूजेसाठी लोकांची गर्दी होऊ लागली. कडेकोट प्रशासकीय सुरक्षा व्यवस्थेत पूजा सुरू झाली आहे. मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला असून, भाविक व्यास तळघरात जाऊन पूजन करत आहेत. तर, रात्रीच्या वेळी काही तरुणांनी ज्ञानवापीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील साईन बोर्डवर 'ज्ञानवापी मंदिर मार्ग' असे लिहिले. याचा फोटो व्हायरल होत आहे.