नवी दिल्ली: ज्ञानवापी मशिदीच्या वादासंदर्भात मोहन भागवत यांनी दोन्ही समाजाचे कान टोचले. ज्ञानवापी प्रकरण श्रद्धेचा विषय असून न्यायालय जो निर्णय देईल तो सर्वांनी मान्य केला पाहिजे. प्रत्येक मशिदीत ‘शिवलिंग’ शोधण्याची, तसेच दरदिवशी नवा वाद निर्माण करण्याची गरज नाही, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) म्हणाले होते. याला एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी उत्तर दिले आहे. एकामागून एक १७ ट्विट करत १७ मुद्द्यांवर ओवेसी यांनी भाष्य केले आहे.
मोहन भागवत यांचे हे वक्तव्य प्रक्षोभक आणि दुर्लक्षित केले जाऊ नये. एखादी गोष्ट लोकप्रिय नसताना त्यापासून स्वत:ला दूर सारायचं आणि ती लोकप्रिय झाल्यानंतर स्वीकारायची हा संघाचा जुना डावपेच आहे. बाबरीच्या आंदोलनानदरम्यानही संघाने आधी आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करु असे म्हटले होते, अशी आठवण ओवेसींनी करुन दिली. मात्र कोणत्याही संवैधानिक पदावर नसणाऱ्या मोहन भागवत आणि जे. पी. नड्डांसारख्या व्यक्तींऐवजी पंतप्रधान मोदींनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करत १९९१ च्या धर्मस्थळांसंदर्भातील कायद्याच्या आधारे स्पष्ट संदेश द्यावा, अशी मागणी ओवेसी यांनी केली आहे.
भारतामध्ये इस्लाम धर्म हा व्यापारी आणि बुद्धीजीवींमुळे आला
भारतामध्ये इस्लाम धर्म हा व्यापारी आणि बुद्धीजीवींमुळे आला. हे सर्वजण इस्लाम धर्म मुस्लीमांनी या भूमीवर केलेल्या आक्रमणांच्या फार पूर्वीच घेऊन आले होते. आजच्या मुस्लिमांचे पूर्वज कुठून आलेत हे सध्या महत्वाचं नाही. जरी त्यांचे पूर्वज हिंदू असले तरी भारतीय संविधानानुसार हे भारतीयच आहेत. भागवत यांच्या पूर्वजांनी बळजबरीमुळे बौद्ध धर्मामधून धर्मांतर केले, असे उद्या कोणी म्हणून लागले तर काय करणार, असा सवाल ओवेसी यांनी केला आहे.
अयोध्येचा मुद्दा संघाच्या अजेंड्यावर नव्हता
विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेआधी अयोध्येचा मुद्दा संघाच्या अजेंड्यावर नव्हता. १९८९ च्या पालनपूरमधील ठरवानंतरच अयोध्या हा संघाच्या अजेंड्याच्या भाग झाला. संघाने राजकीय विषयावर एकाचवेळी दोन वेगवेगळ्या भूमिका घेण्यात निपुणता मिळवली आहे. काशी, मथुरा, कुतूबमिनार संदर्भातील विषयांवर बोलणाऱ्या सर्व विदूषकांचा थेट संबंध संघाशी आहे, असा दावा ओवेसी यांनी केला. तसेच अन्य एक स्पष्टीकरण म्हणजे संघाचे गुंड आता ना मोदींचे ऐकत ना भागवतांचे. दोघांनाही झुंडबळींचा निषेध केला होता. मात्र त्यामुळे हे प्रकार थांबले का? उलट, त्यांनी रामनवमीच्या यात्रांदरम्यान काय केले आपण पाहिले. याचा अर्थ या गोष्टी पुढेही घडत राहणार. हे फक्त ढोंग आहे, असा आरोप ओवेसी यांनी केला.
दरम्यान, तेलंगणमधील भाजपचे बंडी संजय कुमार यांनी दिलेल्या इशाऱ्यासंदर्भात ओवेसी म्हणाले की, काहींनी आम्हाला बाबरी द्या इतर कोणत्याही मशिदींनी हात लावणार नाही, असे म्हटले होते. इतरांनी केवळ अयोध्या, काशी आणि मथुरा आणि अनेकांनी मध्यकालीन सर्वच मशिदींचा उल्लेख केला. तेलंगण भाजपाच्या अध्यक्षांनी राज्यातील प्रत्येक मशिदीमध्ये खोदकाम करुन पाहिले पाहिजे असे म्हटले. त्यांचे शब्द तर कागदावर लिहिण्याच्या लायकही नाहीत, असे ओवेसी म्हणाले.