नवी दिल्ली - एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला आहे. भारतातील मुसलमान जगात सर्वात समाधानी आहेत, असे मोहन भागवत यांनी म्हटले होत्या. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत, आम्ही किती आनंदी आहोत, हे भागवतांनी सांगू नये. कारण, त्यांची विचारधाराच मुसलमानांना द्वितीय श्रेणीचे नागरिक बनवू इच्छिते, असे ओवेसींनी म्हटले आहे.
एका मुलाखतीत मोहन भागवत म्हणाले होते, भारतातील मुस्लीम सर्वाधिक समाधानी आहेत. पुढे त्यांनी प्रश्न विचारला, जगात असे एकतरी उदाहरण आहे का, की जेथे त्या देशाच्या नागरिकांवर शासन करणारा परकीय धर्म आजही अस्तित्वात आहे? आपल्या या प्रश्नाचे उत्तर देत भागवत म्हणाले होते, कुठेही नाही, केवळ भारतातच असे आहे.
भागवतांच्या याच वक्तव्यावर ओवेसी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ओवेसींनी ट्विट केले आहे, "आनंदाचे मापदंड काय आहेत? हेच, की भागवत नावाची एक व्यक्ती आम्हाला नेहमीच सांगत राहिली, की आम्हाला बहुसंख्यकांप्रती किती आभारी असायला हवा? आमच्या आनंदाचा मापदंड हा आहे, की संविधानाप्रमाणे आमच्या मर्यादांचा आदर केला जातो, की नाही? आता आम्हाला, हे सांगू नका, की आम्ही किती आनंदी आहोत, कारण मुसलमानांना द्वितीय श्रेणीचे नागरिक बनवले जावे, असे आपल्या विचारधारेची इच्छा आहे."
एखाद्याला भारतात राहण्यासाठी हिंदूंचे श्रेष्ठत्व मान्य करावेच लागेल, अशी कुठलीही अट नाही आणि संविधानही हे सांगत नाही, असेही भागवत म्हणाले होते. यावर बोलताना ओवेसी म्हणाले, "मी आपल्याला असे म्हणताना ऐकू इच्छित नाही, की आम्हाला आमच्याच होमलँडमध्ये राहण्यासाठी बहुसंख्यकांप्रती कृतज्ञता व्यक्त करायला हवी. आम्हाला बहुसंख्यकांची दया नको. आम्ही, जगातील मुसलमानांसोबत आनंदात राहण्याच्या शर्यतीत नाही. आम्हाला केवळ आमचा अधिकार हवा आहे."