नवी दिल्ली: सैन्यात किती मुस्लिम आहेत?, असा वादग्रस्त प्रश्न एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला. मोदींच्या कार्यकाळात लष्करी सेवेत किती मुस्लिमांना सामावून घेण्यात आलं, असा सवाल ओवैसी यांनी विचारला आहे. मोदींनी आपल्याला खोटं ठरवून दाखवावं, असं आव्हान देत भाजपा सरकारनं मुस्लिमांसाठी काहीच केलं नाही, असा आरोपदेखील त्यांनी केला. गेल्या चार वर्षांमध्ये किती मुस्लिमांना सीमा सुरक्षा दल, रॅपिड अॅक्शन फोर्स आणि इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलात नोकऱ्या मिळाल्या?, असा प्रश्न ओवैसी यांनी एका जनसभेला संबोधित करताना उपस्थित केला. गेल्या चार वर्षांमध्ये संरक्षण दलांमध्ये किती मुस्लिमांना नोकऱ्या दिल्या, याची आकडेवारी सरकारनं आठवड्याभरात द्यावी, असं खुलं आव्हान त्यांनी दिलं. 'तुम्ही मुस्लिमांच्या एका हातात कॉम्प्युटर आणि एका हातात संगणक देण्याची भाषा करतात. मात्र नोकऱ्याच नाहीत. इंटरनेटवर काहीच दिसत नाहीत,' असं ओवैसी म्हणाले. 'सीआयएसएफमध्ये 3.7 टक्के, सीआरपीएफमध्ये 5.5 टक्के तर रॅपिड अॅक्शन फोर्समध्ये 6.9 टक्के मुस्लिम असल्याची माहिती माझ्या एका भावानं मला दिली,' असंही त्यांनी म्हटलं. भाजपानं दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसवर 'मुस्लिमांचा पक्ष' अशी टीका केली होती. यावरुन काँग्रेस आणि भाजपावरुन जुंपली असताना आता या वादात ओवैसींनीही उडी घेतली. 'हे दोन्ही पक्ष मुस्लिमांना काय संदेश देऊ पाहत आहेत? मुस्लिम हा शब्द खराब आहे का?' असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
चार वर्षांमध्ये किती मुस्लिमांना सैन्यात सामावून घेतलं? ओवैसींचा मोदींना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 5:32 PM