Asaduddin Owaisi on Navneet Rana हैदराबाद : अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. हैदराबादमध्ये भाजपा उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारादरम्यान नवनीत राणा यांनी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि त्यांचे छोटे बंधू आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर निशाणा साधला.
यावेळी १५ सेकंदांसाठी पोलीस हटवले तर तर मोठ्या (असदुद्दीन ओवेसी) आणि धाकट्याला (अकबरुद्दीन ओवेसी ) कळणारही नाही की, कुठून आले आणि कुठे गेले. आम्हाला फक्त १५ सेकंद पुरेसे ठरतील, असे वक्तव्य नवनीत राणा यांनी केले आहे. यावर आता असदुद्दीन ओवेसी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही १५ तास घ्या, तुम्हाला कोण घाबरतंय. आम्ही इथंच बसलो आहोत, असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले.
नवनीत राणा यांना आव्हान देताना तुम्हाला आता काही तरी करून दाखवावे लागेल, असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले. तसेच, "आम्ही इथं बसलो आहोत, तुम्ही ते करा. तुम्हाला ते करून दाखवावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगा आणि १५ सेकंद नाही तर १५ तास घ्या. शेर जहां भी रहे, शेर शेर ही होता है", असे असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, गेल्या काही वर्षांत घडलेल्या मॉब लिंचिंगच्या घटनांचा संदर्भ देत असदुद्दीन ओवेसी यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, "तुम्ही काय कराल? १५ सेकंद किंवा एक तास घ्या. कोण घाबरत आहे? आम्ही तयार आहोत. तुम्ही काय कराल? अखलाकचे हाल कराल? जसे मुख्तारसोबत केले, तसे हाल कराल, पेहलू खान कराल? दिल्लीत पंतप्रधान तुमचा आहे. सर्व गोष्टी तुमच्या आहेत. आम्ही येऊ."
भाजपा उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारादरम्यान महबुबनगर येथे एका जाहीर सभेला संबोधित करत असताना नवनीत राणा यांनी आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्या २०१३ सालातील विधानाचा हवाला देऊन टीका केली. तसेच, नवनीत राणा यांनी या वक्तव्याचा व्हिडीओ आपल्या एक्स अकाऊंटवरही शेअर केला आहे. दरम्यान, २०१३ मध्ये अकबरुद्दीन ओवेसी यांनी १५ मिनिटासाठी पोलिसांना हटवा, मग आम्ही दाखवून देऊ, कोणात किती दम आहे, असे अकबरुद्दीन ओवेसी यांनी म्हटले होते.
कोण आहेत माधवी लता?लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने माधवी लता यांना हैदराबादमधून असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे. माधवी लता या व्यवसायाने डॉक्टर आहेत. विंरिंची नावाचे हॉस्पिटल देखील चालवतात. सोशल मीडियावर त्या आपल्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे चर्चेत असतात. तसेच, माधवी लता या एक भरतनाट्यम नृत्यांगना देखील आहेत. याशिवाय, त्या सामाजिक कार्यातही सहभागी असतात. हैदराबादचे ज्येष्ठ व्हीएचपी नेते भगवंत राव पवार यांना डावलून यंदा भाजपाने लता यांना उमेदवारी दिली आहे.