हैदराबाद: हैदराबादचे खासदार आणि AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी लोकशाहीवरुन केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जयपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना ओवेसींनी अग्निपथ योजनेवरुन मोदी सरकारला घेरले. तसेच, सरकारने योग्य व्यवस्थापन न केल्यास भारतात श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे म्हटले आहे.
असदुद्दीन ओवेसी म्हणाले, "अग्नीपथ योजना असो किंवा शेतकरी विधेयक, सीएए आणि दलितांवरील अत्याचारासह देशभरात विविध मुद्द्यांवर निदर्शने झाली. म्हणूनच मी म्हणतोय, एक दिवस भारताची परिस्थिती श्रीलंकेप्रमाणे होईल. श्रीलंकेतील लोक ज्याप्रकारे राष्ट्राध्यक्षांच्या घरात घुसले, त्याप्रमाणे भारतीय नागरिक पंतप्रधानांच्या घरात घुसून बसतील."
ओवेसी म्हणाले की, ''श्रीलंकेसारखी परिस्थिती भारतात येऊ नये, अशी माझी इच्छा आहे.'' यावर पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी त्यांना विचारले की, 'उद्या ते (भाजप) हैदराबादमध्येही येऊ शकतात.' त्याला उत्तर देताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, 'ते नक्की येऊ शकतात. ही लोकशाही आहे, देशात कोणी कुठेही जाऊ शकतो."
गेल्या महिन्यात सरकारने सैन्य भरतीसाठी अग्निपथ योजना आणली आहे. या योजनेला तरुणांनी जोरदार विरोध केला. विरोधी पक्ष आजही सरकारकडे ही योजना रद्द करण्याची मागणी करत आहे, पण सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे. अग्निपथ योजनेच्या विरोधात अनेक राज्यांमध्ये निदर्शने, तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांचाही अग्निपथ योजनेला विरोध आहे. भाजप खासदार वरुण गांधी यांनीही अग्निपथ योजनेविरोधात अनेक ट्विट केले. मात्र, ही योजना मागे घेतली जाणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.