नवी दिल्ली - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी "नरेंद्र मोदींचे तीन यार – ड्रामा, उपद्रव आणि अत्याचार" असं म्हटलं आहे. ओवेसींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.
असदुद्दीन ओवेसी यांनी अमित शाह यांच्यावर देखील टीकास्त्र सोडलं आहे. आता अमित शाहांना उत्तर द्यायचे आहे. आम्ही कोणाचं कर्ज बाकी ठेवत नाही असं म्हटलं आहे. "नसीमुद्दीनचं नाव घेतलं मात्र काँग्रेस पार्टी तर बोलणार नाही. नसीमचं नाव घेतलं तर आमची मतं मिळणार नाहीत. काँग्रेस इमरानचं नाव घेणार नाही. समाजवादी पार्टी आझमचं नाव नाही घेणार मात्र आम्ही अमित शाह आणि मुख्यमंत्री योगींना सांगू इच्छितो की, यूपीमध्ये योगी ‘राज’ (Raj) आहे. त्याचा अर्थ R (र) – रिश्वत (लाच), A – ‘अ’ आतंक (दहशत), आणि J - ‘ज’ चा अर्थ जातीवाद. अमित शाह तुमचं कर्ज फिटलं" असं म्हटलं आहे.
ओवेसी यांनी या जाहीर सभेत हरिद्वारच्या धर्मसंसदेतील विधानाचा मुद्दाही उपस्थित केला आणि ही धर्मसंसद भाजपा आणि पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने पार पडल्याचं सांगितलं. देशात मुस्लिमांच्या हत्येची चर्चा होत असताना त्याविरोधात कोणी आवाज का उठवत नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. उत्तर प्रदेशमध्ये फेब्रुवारी-मार्चमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात. त्यामुळे सर्वच पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. या पार्श्वभूमीवर आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
काही दिवसांपूर्वी ओवेसी यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ओवेसी यांनी त्यावर स्पष्टीकरण देत त्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला असल्याचं स्पष्टीकरण दिलं. "उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारादरम्यान करण्यात आलेलं वक्तव्य हे पोलिसांना दिलेली धमकी नव्हती. हरिद्वारमधील माझ्या भाषणावरुन लक्ष विचलित करण्यासाठी माझ्या कानपूरमधील भाषणाची एका मिनिटांची क्लिप व्हायरल केली जात आहे" असं ते म्हणाले होते.