नवी दिल्ली - मुझफ्फरनगर दंगलीशी संबंधित तीन भाजप आमदारांवरील गुन्हे मागे घेण्याची तयारी सुरू आहे. भाजप आमदारांवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्यासाठी उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने अर्ज दाखल केला आहे. सरकारच्या या निर्णयावर AIMIMचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी योगी सरकारवर हल्ला चढवला आहे.
ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM)चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी ट्विट करत म्हटले आहे, "2017 मध्ये उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःच त्यांच्या विरोधात दाखल असलेले अनेक घटले मागे घेतले होते. आता ते त्यांच्या इतर सहकाऱ्यांसह उभे आहेत. जर सरकारच गुन्हेगारांचे झाले, तर सर्वात पहिले न्यायाचेच 'एन्काउंटर' होते."
बसपाच्या सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी या मुद्द्यावर ओवेसींपेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे. मायावतींनी ट्विट करत, "उत्तर प्रदेशात भाजपच्या नेत्यांवर "राजकीय द्वेष" भावनेतून दाखल करण्यात आलेले गुन्हे परत घेण्याबरोबरच सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांवरही दाखल असलेले, असे गुन्हे निश्चितपणे मागे घ्यायला हवेत, बीएसपीची ही मागणी आहे," असे म्हटले आहे.