एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भारतीय जनता पक्ष आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये एवढा दम आहे, तर मग चीनवर सर्जिकल स्ट्राइक का करत नाही? असा सवाल ओवेसी यांनी केला आहे. ते मंगळवारी तेलंगणातील आदिलाबाद येथे एका जाहीर सभेत बोलत होते. तत्पूर्वी, आपण तेलंगणातील जुन्या शहरात सर्जिकल स्ट्राइक करू, असा दावा भाजपचे राज्य प्रमुख बंदी संजय यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर ओवेसींनी पलटवार केला आहे.
ओवेसी म्हणाले, ते म्हणतात की आम्ही ओल्ड सिटीमध्ये सर्जिकल स्ट्राइक करू. तर मग आम्ही काय बांगड्या घालून बसलो आहेत का? भाजपमध्ये एवढाच दम असेल, तर त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार चीनवर सर्जिकल स्ट्राइक का करत नाही. तत्पूर्वी, 2020 मध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना, बंदी संजय म्हणाले होते, सत्ताधारी भारत राष्ट्र समिती (टीआरएस) आणि एआयएमआयएम रोहिंग्या, पाकिस्तानी आणि अफगानिस्तानी मतदातारांच्या मदतीने जीएचएमसी निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत.
अमित शाह यांच्यावर निशाणा -यावेळी ओवेसी यांनी केसीआर आणि आपल्यातील गुप्त कराराच्या दाव्यांवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, जर स्टेअरिंग माझ्या हाती असेल तर, आपल्याला (अमित शाह) त्रास का होतो? एवढेच नाही, तर भाजपने मंदिरांसाठी कोट्यवधी रुपये मंजूर केले आहेत आणि माझ्यावर आरोप करत आहेत की, स्टेअरिंग माझ्या हाती आहे. जर स्टेअरिंग माझ्या हातात असेल, तर तुम्हाला त्रास का होतात? असा सवालही ओवेसी यांनी यावेळी केला.
ओवेसी पुढे म्हणाले, तेलंगणातील काँग्रेसचे नेते म्हणत आहेत की, राज्यात त्यांचे सरकार आले, तर 100 मतदारसंघांमध्ये राम मंदिर बांधतील आणि त्यांच्या उभारणीसाठी 10 कोटी रुपये देतील. तरीही भाजप नेते म्हणतात की, मुस्लिमांची खुशामत केली जात आहे, मुस्लीम समाजाचे तुष्टीकरण केले जात आहे. खरे तर, मंदिरांना पैसा का दिला जात आहेत, यावर तेलंगणातील मुस्लिमांचा आक्षेप नाही. पण, पैसे द्यायचेच असतील तर सर्वांनाच द्या, कुणा एकट्याला देऊ नका, असेही ओवेसी म्हणाले.